कोल्हापूर • प्रतिनिधी
“मानव सेवा हीच ईश्वर सेवा” या तत्वावर अनेक समाज कार्यरत असून, भावी पिढीला सुसंकृत आणि आदर्शवत बनविण्याचे कार्य समाज मंदिरामधून होत आहे. राजर्षि शाहू महाराजांनी करवीरनगरीतील अनेक समाजांच्या उन्नतीसाठी ठोस निर्णय घेवून त्यांना मंदिरे, सभागृहे, विद्यार्थी वसतिगृहे उभारण्याकरिता जागा दिल्या. यातून खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती साध्य करत शहरातील अनेक समाज मंदिरांनी आप-आपल्या समाज बांधवांसह इतर समाजातील बांधवांनाही न्याय देण्याची भूमिका ठेवली. सामजिक सलोखा जपणारी ही समाजमंदिरे सामाजिक कार्याची प्रेरणास्थाने म्हणून नावारूपास यावीत, याकरिता सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
शनिवार पेठ येथील नामदेव शिंपी समाजाच्या श्री ज्ञानेश्वर भजनी मंडपाच्या सभागृह बांधकामाच्या पहिल्या टप्प्यात रु.१० लाखांचा निधी यापूर्वी देण्यात आला असून, दुसऱ्या टप्प्यातील रु.१० लाख इतका वाढीव निधीतील कामाचा शुभारंभ आज करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले कि, आपण ज्या समाजात जन्मलो, वाढलो, त्या समाजाचे आपल्यावर ऋण असते आणि ते ऋण फेडणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. आपली संस्था आपल्या समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून आपल्या समाजाच्या विकासासाठी, समाज बांधवांच्या विकासासाठी श्री नामदेव शिंपी समाज करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. शहरातील अन्य समाज मंदिरांचाही अशाच पद्धतीने विकास व्हावा. सामाजिक सलोखा, सामाजिक कार्ये या समाज मंदिरातून व्हावीत, अशी आपली प्रांजळ भावना असून, लवकरच शहरातील इतर समाजांच्या समाज मंदिरांच्या विकासासाठी निधीची तरतूद करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल, असे सांगितले.
याप्रसंगी मंडप सभागृहास एकूण रु.२० लाखांचा निधी मंजूर केल्याबद्दल श्री नामदेव शिंपी समाजाच्यावतीने राजेश क्षीरसागर व याकामी पाठपुरावा केल्याबद्दल माजी नगरसेवक नंदकुमार मोरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी महापौर ॲड.महादेवराव आडगुळे, युवानेते ऋतुराज क्षीरसागर, निलेश हंकारे, नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष दिनकर शिवाजी पाटील, विश्वस्त सुरेश हावळ, ज्ञानोबा आंबी, सेक्रेटरी चंद्रकांत काकडे, बाळासाहेब काकडे, अविनाश जठार आदी समाजबांधव उपस्थित होते.