कोल्हापूर • प्रतिनिधी
पोलंड, हंगेरी, झेक प्रजासत्ताक व स्लोव्हाकीया या चार मध्यपूर्व युरोपियन राष्ट्रांची युती आहे. याला ‘दि विसेग्राड ग्रुप’ किंवा ‘व्ही 4’ या नावाने ओळखले जाते. परस्परांमधील सांस्कृतिक व राजकीय संबंध वृद्धिंगत व्हावेत, या उद्देशाने या चार राष्ट्रांनी एकत्र येत १९९१ साली या ग्रुपची स्थापना केली. नुकतीच या ग्रुपच्या स्थापनेस ३० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने दिल्ली येथे या चारही राष्ट्रांच्या दूतावासांनी संयुक्तपणे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास खासदार संभाजीराजे छत्रपती यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते.
यानिमित्त खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिल्ली येथे झालेल्या या कार्यक्रमास उपस्थित राहून चारही राष्ट्रांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी या कार्यक्रमास युरोपीयन युनियनचे भारतातील राजदूत उगो अस्टुटो, पोलंडचे राजदूत अॅडम बुराकोवस्की, हंगेरीचे राजदूत अँड्रस् किरली, स्लोव्हाकियाचे राजदूत इव्हान लँकारिक, झेक प्रजासत्ताकचे राजदूत मिलान होवोर्का यांचेसह परराष्ट्र मंत्रालयाचे पश्चिम सचिव विकास स्वरूप, परराष्ट्र मंत्रालयाचे आर्थिक संबंध विभागाचे सचिव राहूल छाब्रा, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे महासंचालक दिनेश पटनाईक हे उपस्थित होते.