कोल्हापूर • प्रतिनिधी
संदीप देसाई हे सामाजिक जाणीव असणारे कार्यकर्ते आहेत. ते पुन्हा स्वगृही परतल्याने आनंद झाला. भाजपचा विचार घरोघरी पोचवून उत्तर मतदारसंघात नाना कदम यांना निवडून आणण्यात त्यांचे मोठे योगदान असेल, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले. आ. चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संदीप देसाई यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष असे पद देण्यात आले आहे.
संदीप देसाई हे पूर्वी भारतीय जनता पक्षात सक्रिय होते. युवा मोर्चा अध्यक्ष, भाजप जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. गेल्यावर्षी ते पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र आज त्यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
मी नेहमीच राष्ट्रीय विचाराने सामाजिक काम करतो त्यामुळे भाजपकडे माझा ओढा होताच. नव्याने पक्ष प्रवेश करून पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी मी प्रयत्न करेन, असे संदीप देसाई यांनी सांगितले.
या पक्ष प्रवेशावेळी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, विजयसिंह खाडे-पाटील, हेमंत आराध्ये, विवेक कुलकर्णी, सचिन तोडकर, प्रवीण चौगुले, रमेश दिवेकर, रोहित पाटील, नरेश जाधव, अविनाश साळे, दीपक देसाई, राहुल घाडगे, रोहित फराकटे, अवधूत कोळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.