संताजी घोरपडे शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याशी एकनिष्ठ: प्रा.डॉ.पवार


  कोल्हापूर • प्रतिनिधी
     सरसेनापती संताजी घोरपडे कधीच मोगलांना जाऊन सामील झाले नाहीत. ते शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले. अशा या महान योद्ध्याचे साखर कारखान्याच्या रूपाने जिवंत स्मारक मंत्री हसन मुश्रीफ यांनी याआधीच उभे केले आहे. तसेच त्यांच्या सेनापती कापशी येथे होत असलेले स्मारक गौरवास्पद आहे, अशी भावना ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांनी व्यक्त केली.
     ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याने सेनापती कापशी (ता. कागल) येथे सुरु असलेल्या सरसेनापती संताजी घोरपडे स्मारकांच्या कामांसंदर्भात चर्चा करण्यासाठी इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांच्या घरी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट घेतली. यावेळी  महान मराठा योद्धा सरसेनापती संताजी घोरपडे यांचे तैलचित्र मंत्री श्री. मुश्रीफ यांना देण्यात आले. प्रा. डॉ. जयसिंगराव पवार, सौ. वसुधा पवार, शशिकांत खोत आदी उपस्थित होते.
     डॉ. पवार पुढे म्हणाले, औरंगजेबाचे चरित्रकार खाफीखान व साकीम उस्तेद खान यांनीही संताजीच्या शौर्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. एवढी त्यांची महानता होती.
      मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, या स्मारकासाठी पहिल्या टप्प्यात पावणेदोन कोटी रुपये निधी मंजूर झाला होता. परंतु; गेल्या पाच वर्षात भाजप सरकारच्या काळात या स्मारकाचे काम निधीअभावी रखडले. आत्ता पावणेसात कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.
      यावेळी स्मारकासह परिसरातील सभागृह, ग्रंथालय, सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या अश्वारूढ पुतळ्यासह चबुतरा या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
      यावेळी माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एस. माने, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, कागलचे उप अभियंता डी. व्ही. शिंदे, सुनील चौगुले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *