सातबारा व प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन तसेच ऑफलाईन मिळावे

• शहर व जिल्हा नागरी कृती समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
कोल्हापूर • प्रतिनिधी
     सातबारा व प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन तसेच ऑफलाईन मिळावे, अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना ई-मेलव्दारे निवेदन पाठवून केली आहे.
     याबाबत कृती समितीने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यामध्ये शासनाने प्रॉपर्टी कार्ड व सातबारा उतारे घरबसल्या ऑनलाईन उपलब्धतेची सेवा सुरू केली आहे, ती स्वागतार्ह आहे. परंतु महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती पाहता त्याचबरोबर इंटरनेट सुविधाची परिस्थितीही अतिशय ढिसाळ असल्याने त्याचा उपयोग सर्वसामान्य लोकांना इंटरनेट सुविधा उपलब्ध होत नसल्याने याचा फायदा त्यांना होत  नसल्याचा दिसतो. त्याचबरोबर नागरी सुविधा केंद्रावर सामान्य नागरिकांची शासनाची फी वजा जादाची रक्कम स्वीकारून आर्थिक पिळवणूक होत आहे आणि त्यांच्यावर कुठलेही नियंत्रण दिसत नाही. त्यामुळे राज्यामध्ये तसेच कोल्हापूर जिल्ह्यात व शहरामध्ये ऑनलाईन सातबारा व प्रॉपर्टी कार्ड मिळकत धारिका ऑनलाइन देण्याची सोय केली आहे. परंतु सर्वच लोकांना ऑनलाईन सातबारे व प्रॉपर्टी कार्ड काढता येते असे नाही. तरी पूर्वीप्रमाणे तलाठी कार्यालयामध्ये व सिटी सर्व्हे ऑफिसमध्येही सदर सातबारे व प्रॉपर्टी कार्ड देण्याची ऑफलाइन पद्धतीची सोय पूर्वीप्रमाणेच चालू ठेवावी. त्यामुळे सामान्य नागरिकांची आर्थिक व मानसिक पिळवणूक होणार नाही, असे आम्हांस वाटते, म्हणून समितीच्यावतीने  हे निवेदन सादर करत आहोत. तरी या गोष्टीचा सहानुभूतीपूर्वक विचार होऊन आपल्या स्तरावर योग्य ते आदेश व्हावे व सामान्य नागरिकांना न्याय मिळावा ही विनंती.
       कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्यावतीने अशोक पोवार, रमेश मोरे, अजित सासने, भाऊ घोडके, प्रमोद पंगावकर, चंद्रकांत पाटील, महेश जाधव, पप्पू सुर्वे, राजेश वरक, दादा लाड, लहुजी शिंदे यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *