कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त, राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, प्रागतीक लेखक संघ व निर्मिती फिल्म क्लब यांच्यावतीने शाहू स्मारक भवन येथे मराठी गीते, लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, लहान मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, गुणवंत कामगारांचा सत्कार, कोरोना योद्धा पुरस्कार तसेच कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते.
यावेळी आ. ऋतुराज पाटील, आ. जयंत आसगावकर, संमेलनाध्यक्ष डॉ. सतीशकुमार पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या ध्येय धोरणानुसार सुरु असलेल्या चौफेर सामाजिक कार्याबद्दल विशेष उल्लेख व्यक्त करून सर्व पदाधिकारी व कार्यकारणीचे कौतुक केले. सध्या देशभर जाती-धर्माच्या नावावर समाज विभागण्याचे मोठे कट कारस्थान सुरू असून शासकीय यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर करून, सामान्य माणसांचा आवाज बंद करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी एकसंघ राहून राष्ट्रीय एकात्मता व ऐक्य जोपासले पाहिजे असे सांगितले.
आमदार जयंत आसगावकर यांनी कोल्हापूर जिल्हा शाहूंच्या विचारांचा वारसा जपणारा असून येथे धर्मांध शक्तींचा शिरकाव होणार नाही, याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे असे मत व्यक्त केले.
डॉ. सतीशकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कवी संमेलनामध्ये निमंत्रित कवी म्हणून प्रा. रंजना सानप, प्रा. शोभा चाळके, रामचंद्र चौगुले, प्रा. स्मिता गिरी, शिवाजी चव्हाण, सात्ताप्पा सुतार, डॉ. दयानंद काळे, प्रताप घेवडे, प्रविण कामत यांच्यासह ६० कवींनी आपल्या कविता सादर केल्या. यावेळी गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त दिनकर अडसूळ यांचा सत्कार करण्यात आला. निर्मिती फिल्म क्लबच्यावतीने संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला.
कार्यक्रमास मकरंद बुरांडे, गौरी मुसळे, दिलीप गाताडे, ॲड. प्रकाश मोरे, ॲड. विवेक घाटगे, कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे, भरत लाटकर, किसनराव कुराडे, महानंदाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, मानवाधिकार संघटनेचे राजाध्यक्ष संतोष भिसे, हरिश्चंद्र धोत्रे आदी उपस्थित होते. सदर महोत्सवाचे आयोजन प्रसंगी प्रा. शोभा चाळके, महादेव चक्के, भगवान माने, संभाजी थोरात, संजय सासणे, शिवाजी चौगुले, सतीश मुसळे, शिवाजी येडवान, सात्ताप्पा सुतार, अच्युतराव माने, प्रभाकर कांबळे, केरबा डावरे, रामेश्वर वरखडे, अशोकराव जाधव, भरत सकपाळ, मुकुंद कोकणे, तात्या भोसले आदींनी विशेष परिश्रम घेतले. सुरेश केसरकर यांनी प्रास्ताविक केले. शांतीलाल कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत सावंत यांनी आभार मानले.