• विजय निश्चित असल्याचा सर्व नेत्यांनी व्यक्त केला विश्वास
कोल्हापूर • प्रतिनिधी
महाराष्ट्र विधान परिषद कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी द्विवार्षिक निवडणूक २०२१साठी गुरुवारी सतेज उर्फ बंटी डी. पाटील (इंडियन नॅशनल काँग्रेस) यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे एक नामनिर्देशन पत्र दाखल केले.
कोल्हापूर विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे पालकमंत्री सतेज पाटील यांनी उमेदवारी अर्ज राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर, आ. पी.एन. पाटील आदींच्या उपस्थितीत दाखल केला. यावेळी विजय निश्चित असल्याचा सर्व नेत्यांनी विश्वास व्यक्त केला.
महाविकास आघाडीकडे २७० हून अधिक मते आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा विधानपरिषदेचे उमेदवार सतेज पाटील यांच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी राहिली असून, सतेज पाटील यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास आज झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात सर्व नेत्यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीतील प्रमुख नेतेमंडळींच्या उपस्थितीत धैर्यप्रसाद हॉल येथे हा मेळावा संपन्न झाला.
विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या जिल्हा परिषद सदस्यांचा मेळावा धैयप्रसाद हॉल येथे पार पडला. या मेळाव्यासाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी, महाविकास आघाडी सरकारच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांना विकास कामासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला गेला. हा निधी देताना सदस्याचा पक्ष पाहिला नाही. भाजप पक्षाच्या अनेक सदस्यांना देखील महाविकास आघाडीच्या माध्यमातून विकास निधी दिला गेला. महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर गेल्या तीन वर्षांत ५२४ कोटीचा निधी कोल्हापूर जिल्हा परिषदेला देण्यात आला. तर भाजप सरकारच्या पाच वर्षाच्या काळात केवळ १७७ कोटीचा विकास निधी जिल्हा परिषदेला मिळाला. त्यामुळे विकास निधीचा हा आलेख असाच राखण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापतींनी विधानपरिषदेचे उमेदवार सतेज पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना विजयी करावे असे आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी, शिवसेनेचे एक मतही बाहेर जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. विधानपरिषदेचे उमेदवार सतेज पाटील हे २७० चा आकडा पार करतील. त्यांचा विजय हा काळ्या दगडावरची रेष असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नाम. सतेज पाटील यांनी जिल्ह्यात केलेली विकासकामे पाहता त्यांच्या विजयाची औपचारिकता बाकी राहिली असून कार्यकर्त्यांनी आता डोळ्यात तेल घालून कामाला लागावे असे आवाहनही त्यांनी केले.
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर यांनी, महाविकास आघाडीचा घटक म्हणून आपण पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सोबतच राहणार असून, मेळाव्यासाठी उपस्थितांची संख्या पाहता सतेज पाटील यांचा विधानपरिषदेच्या निवडणुकीत विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी, स्वाभिमानी शेतकरी संघटना पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पाठीशी राहणार असल्याचे सांगितले. खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार पी. एन. पाटील आदींनी मनोगत व्यक्त करत या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष एकत्र असल्याने सतेज पाटील यांचा विजय मताधिक्याने होणार असल्याचे सांगितले.
पालकमंत्री तथा विधान परिषदेचे उमेदवार सतेज पाटील यांनी, गेल्या वर्षीच्या निवडणुकीत कोल्हापूरच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी आपणाला संधी दिली. त्यामुळेच जिल्ह्याच्या विकासासाठी आपण कुठेही कमी पडलो नाही. आता पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. त्यावेळची परिस्थिती आणि आताची वेगळी आहे. शिवसेना देखील आता आपल्यासोबत आहे. उमेदवारी कोणाला द्यायची यावरूनच विरोधकांमध्ये अनेक दिवस संभ्रम होता. आपला विजय निश्चित असला तरी कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये. येणाऱ्या काळात सर्वांना सोबत घेऊन काम करू असेही नाम. सतेज पाटील यांनी सांगितले.
या मेळाव्याला शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आ. प्रकाश आबिटकर, आ. राजेश पाटील, आ.चंद्रकांत जाधव, आ. ऋतुराज पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, माजी खासदार निवेदिता माने, माजी आ. उल्हास पाटील, राजीव आवळे, चंद्रदीप नरके, सत्यजीत पाटील सरूडकर, सुजित मिणचेकर, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील , डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सभापती आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————————- Attachments area
![]() | ReplyForward |