कोल्हापूर • प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेने नुकत्याच वरिष्ठ खुला गट व महिला गट तसेच कनिष्ठ गट मुले व मुली अशा खेळाडूंसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या चार विविध वयोगटातील स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर केले असून या वयोगटातील प्रथम दोन विजेते खेळाडू आगामी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करतील.
दि. १९ व २० जुलै रोजी वरिष्ठ महिला गट आणि कनिष्ठ गट (मुले) यांच्या स्पर्धांचे आयोजन केले जाईल. तर २१ व २२ जुलै रोजी वरिष्ठ खुला गट (सर्वांसाठी प्रवेश खुला) आणि कनिष्ठ गट (मुली) यांच्या स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. १९ व २० जुलै रोजी होणाऱ्या स्पर्धेसाठी ऑनलाइन प्रवेश स्वीकारण्याची अंतिम मुदत १८ जुलै असून २१ व २२ रोजी होणाऱ्या निवड चाचणी स्पर्धांसाठी प्रवेशासाठी अंतिम मुदत २० जुलै आहे. सर्व प्रवेश फक्त ऑनलाइन स्वरूपातच स्वीकारले जाणार आहेत.
या बुद्धिबळ स्पर्धा टोर्नेलो या बुद्धिबळ खेळासाठी निर्मित संकेतस्थळावर ऑनलाइन स्वरूपात खेळवली जाणार असून खेळाडूंना ‘झूम’ व ‘टोर्नेलो’ या दोघांवर एकाचवेळी असणे बंधनकारक असणार आहे.
अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या या बुद्धिबळ स्पर्धांसाठी यावर्षी वितरीत केल्या जाणाऱ्या बक्षिसांच्या रकमेत घसघशीत वाढ करण्यात आली आहे. तब्बल एक लाख रुपये वरिष्ठ गटासाठी तर साठ हजार रुपयांची रोख पारितोषिके कनिष्ठ गटासाठी नियोजित असतील. कनिष्ठ गटातील मुले व मुली यांच्या प्रत्येक वयोगटासाठी ३० हजार रुपये तर वरिष्ठ वयोगटासाठी पुरुष व महिला या प्रत्येक वयोगटासाठी ५० हजार रोख बक्षिसे विजेत्यांना दिली जाणार आहेत.
राज्य निवड चाचणी नियोजित स्पर्धांसाठी महाराष्ट्रचेस.ऑर्ग (maharashtrachess.org) व चेस सर्कल. कॉम (chezzcircle.com) या संकेतस्थळांवर बुद्धिबळप्रेमींनी भेट द्यावी, असे आवाहन राज्य बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्ध मयूर व सचिव निरंजन गोडबोले यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष व ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांनी आंतरराष्ट्रीय मानांकित बुद्धिबळ खेळाडूंना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
स्पर्धा प्रवेश नोंदणीसाठी सर्व जिल्हा संघटनांनी तसेच इच्छुक स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी भरत चौगुले (९८५०६५३१६०), प्रवीण ठाकरे (९२२६३७५०७७) व विलास म्हात्रे (८८८८०११४११) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन राज्य संघटनेच्यावतीने केले आहे.