कोल्हापूर • प्रतिनिधी
नैसर्गिक आपत्तीमुळे समाजाचे पर्यायाने देशाचे अतोनात नुकसान होते. इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीपेक्षा वीज कोसळण्यामुळे जास्तीत जास्त लोक मृत्यू पावतात. तसेच इतरही अनेक प्रकारचे नुकसान होते. या आपत्ती विषयीच्या अज्ञान व भीतीमुळे समाजाचे जास्त नुकसान होते. वीज कोसळणे ही नैसर्गिक क्रिया आपण रोखू शकत नाही, मात्र त्यापासून खबरदारी घेऊन सुरक्षित राहू शकतो. अभ्यासपूर्ण संशोधनातून प्राप्त झालेल्या ज्ञानातून व माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने वीज कोसळणे या आपत्तीवर मात करण्यास मदत होते. या आपत्तीपासून बचाव करण्यासाठी जनजागृतीच्या दृष्टीने संशोधनातून प्राप्त ज्ञान हे समाजातील प्रत्येकांने आत्मसात केले पाहिजे असे प्रतिपादन पुणे येथील भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थेचे वैज्ञानिक डॉ. सुनील पवार यांनी केले.
भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय व संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ”वीज सुरक्षा” या विषयावरील ऑनलाईन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, डॉ. सौ.प्रभा पाटील, प्रा. टी. आर. सावंत, आय.क्यू.ए.सी. प्रमुख डॉ. ए. आर. सुपले, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दादा नाडे, डॉ. संतोष माने, प्रा. एन. एन. नाटके, घोडावत विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सौ.सरिता पाटील, डॉ. राणी पवार यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. डी.जी.कणसे म्हणाले ”नैसर्गिक आपत्तीना सामोरे जाण्यासाठी समाजातील प्रत्येक क्षेत्रात संपत्ती व जन सुरक्षाविषयी साक्षरतेची चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी शासन, शिक्षण संस्था आणि जनता यांनी संयुक्तपणे कार्य केले पाहिजे. विज्ञान व माहिती तंत्रज्ञानातून प्राप्त होणाऱ्या ज्ञानातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत नैसर्गिक आपत्तीची शास्त्रीय माहिती सुरक्षेतेच्या दृष्टीने देणे गरजेचे आहे. समाजात याविषयीची जनजागृती होण्यासाठी प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत: प्रत्यक्ष कृतीतून कार्य करावे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
प्रास्ताविकामधे या कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक डॉ. दादा नाडे यांनी वीज सुरक्षेचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एन. एन. नाटके यांनी केले. पाहुण्यांची ओळख डॉ. राणी पवार तर आभार प्रदर्शन डॉ. सरिता पाटील यांनी केले. या उपक्रमाबद्दल अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
——————————————————-