सोमवारपासून शाळा सुरु: महापालिका प्रशासन गतीमान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांची तपासणी व शाळांचे निर्जंतुकीकरण

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     येत्या सोमवारपासून ९वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याच्यादृष्टीने महापालिका प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  आतापर्यंत शहरातील ३७० शिक्षकांची तपासणी तर जवळपास ६५ शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. उर्वरित शिक्षकांची तपासणी  व  शाळांचे निर्जंतुकीकरण व स्वच्छतेचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आल्याची माहिती प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.
     सोमवार दि.२३ नोव्हेंबरपासून ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याच्या राज्य शासनाच्या सूचनेनुसार कोल्हापूर शहरातील ११२ शाळा सुरु करण्यात येणार आहेत. या शाळामधील ११९५ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचीही कोरोनाच्या अनुषंगाने आरटीपीसीआर तपासणी करण्यात येत आहे. महापालिकेच्या शहरातील ११ नागरी आरोग्य केंद्रे व आयसोलेशन हॉस्पिटलसह १२ ठिकाणी कोरोना चाचणीची मोफत सुविधा उपलब्ध केली असून दि. 22 नोव्हेंबरपर्यंत शिक्षाकांची चाचणी पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. या सर्व शाळा व परिसराचे निर्जंतुकीकरण व स्वच्छतेचे कामही गतीने सुरु आहे. हया कामाची जबाबदारी प्रशासन अधिकारी शंकरराव यादव यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तसेच अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शहरस्तरीय शालेय आपत्कालीन समितीही गठीत करण्यात आली असल्याचेही प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.
      शाळा सुरु करत असतांना शिक्षण विभागामार्फत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी व खबरदारीची माहिती देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. वर्गखोली तसेच स्टाफरुममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमांनुसार करण्यात येत आहे. तसेच वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था करण्याचे निर्देशही संबंधितांना देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत: पालकांच्या संमतीवर अवलंबून असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!