• बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन व निसर्गमित्रचे आयोजन
कोल्हापूर • प्रतिनिधी
बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन, पुणे व निसर्गमित्र, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने “पिकांच्या पारंपारिक वाणांचे संवर्धन आणि शाश्वत वापर” याविषयी ६ डिसेंबर रोजी एकदिवसीय चर्चासत्र व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्तम बियाणे हा शेतीचा आत्मा असून गेल्या हजारो वर्षांपासून शेतकऱ्यांनी विविध
पिकांच्या अनेक जाती निवडल्या व त्यात वेळोवेळी सुधारणा करून समृद्ध व निसर्गपूरक अशी पीक विविधता निर्माण केली. परंतु पिढ्यानपिढ्या जोपासलेले व विकसित केलेले हे कृषि वैभव सध्या अभावानेच आढळत आहे. काही निवडक पीक प्रजातींनी हजारो एकर जमीन व्यापून टाकली आहे; त्यामुळेही जैवविविधता धोक्यात आली आहे. पिकांमधील जनुकीय विविधता टिकवणे अत्यंत आवश्यक आहे.
या समस्येचे गांभीर्य ओळखून ‘बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन’ पुणे ही संस्था गेल्या १२ वर्षा पासून महाराष्ट्रातील जव्हार (पालघर), कोले (अहमदनगर), जुन्नर (पुणे), धडगाव (नंदुरबार), एटापल्ली (गडचिरोली), कुडाळ (सिंधुदुर्ग) येथे सखोल संशोधनाचे कार्य करीत आहे.
या महत्वाच्या विषयाची सर्वांना, विशेषत: प्रयोगशील शेतकऱ्यांना व्हावी व माहिती – विचारांची देवाण-घेवाण व्हावी
यासाठी कोल्हापूर जिल्हा व परिसरातील शेतकऱ्यांसाठी बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन, पुणे व निसर्गमित्र,कोल्हापूर
दलितमित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने “पिकांच्या पारंपारिक वाणांचे संवर्धन आणि शाश्वत वापर” याविषयी ६ डिसेंबर २०२१ रोजी एकदिवसीय चर्चासत्र, कार्यशाळा आणि प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेमध्ये पद्मश्री श्रीमती राहीबाई पोपेरे यांच्याशी ऑनलाईन तर संजय पाटील, श्रीमती ममताबाई भांगरे, लक्ष्मण डगळे, योगेश नवले यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधता येईल. यावेळी महाराष्ट्रातील विविध भागातील वैशिष्ट्यपूर्ण अशा ३५० च्यावर देशी पीक वाणांच्या प्रदर्शनाचेआयोजन करण्यात येणार आहे. ज्यामध्ये भात, नाचणी, वरई, राळा, वाल, घेवडा, मका, ज्वारी, चवळी, भाजीपाला, कंद, तेलबिया इत्यादीचा समावेश आहे.
उपक्रमात सहभागी होण्यासाठी आगाऊ नावनोंदणी व अधिक माहितीसाठी २८२३/४८ बी वार्ड, महालक्ष्मीनगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे किंवा मोबाईल नंबर ९४२३८५८७११ अथवा व्हाट्सअप ९८६०५०७८७३) येथे संपर्क साधावा, असे आवाहन निसर्ग मित्र संस्थेचे डॉ. मधुकर बाचूळकर व अनिल चौगुले यांनी केले आहे.