• मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला आदेश
कोल्हापूर • प्रतिनिधी
कर्नाटकातून व कोकणातून येणाऱ्यांच्या तपासणीसाठी कागल चेकपोस्ट व कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत स्वॅब तपासणी केंद्रे उभारा, असे आदेश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिले. फक्त ज्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह येईल त्यांनाच प्रवेश द्या व ज्यांचा पॉझिटिव्ह येईल त्यांना साभार परत पाठवा, अशा कडक सूचनाही त्यांनी दिल्या.
कागलमध्ये कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.
मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये गेल्या जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत ३,८५७ जण बाधित झाले आहेत. त्यापैकी ३,१४७ जण उपचार घेऊन, बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत ५८१ सक्रिय रुग्ण आहेत,१२९ मृत्यू झालेले आहेत. कागलच्या कोविड केअर सेंटरसह गावोगावी उभारलेल्या कोविड केअर सेंटरमधून तीनशेहून अधिक बेड शिल्लक आहेत.
पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला…..
टेस्टिंग वाढविण्यासाठी गावोगावी कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच वाढवलेल्या कोरोना टेस्टिंगमुळे पॉझिटिव्हिटी रेटही कमी झालेला आहे. हा रेट चार टक्के इतका झाला आहे.
या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, पीडब्ल्यूडीचे उपअभियंता डी. व्ही. शिंदे, कागलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, गटशिक्षण अधिकारी डॉ. जी. बी. कमळकर, डॉ. अभिजित शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.
——————————————————- Attachments area