लवकरच शाहू खासबाग मैदानात शड्डू घुमणार!

Spread the love

• खा. बृजभूषण यांची श्रीमंत संभाजीराजे छत्रपती यांना ग्वाही
      राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या स्मृती शताब्दीनिमित्त कोल्हापूरच्या राजर्षी शाहू खासबाग मैदानात राष्ट्रीय स्तरावरील मातीतील कुस्ती स्पर्धांचे आयोजन करणार असल्याची ग्वाही भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी खासदार श्रीमंत संभाजीराजे छत्रपती यांना दिली. यामुळे लवकरच राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानात शड्डू घुमणार आहे.
        छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कारकीर्दीत कुस्तीला प्रचंड प्रोत्साहन दिले. कुस्ती या क्रीडाप्रकारात आमूलाग्र बदल घडविण्याचे श्रेय हे छत्रपती शाहू महाराजांनाच जाते. येत्या ६ मे पासून महाराजांचे स्मृती शताब्दी वर्ष सुरू होत आहे. यानिमित्त राज्यासह देशभरात अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
       यानिमित्त छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीच्या वृद्धीसाठी दिलेले अमूल्य योगदान व या क्षेत्रात केलेले लोकोत्तर कार्य यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरात उभारलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खासबाग कुस्ती मैदानात ‘हिंदकेसरी’सारख्या राष्ट्रीय पातळीवरील मातीतील कुस्ती स्पर्धांचे आयोजन करावे, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याकडे केली. खासदार श्रीमंत संभाजीराजे छत्रपती यांनी दिल्ली येथे खासदार बृजभूषण शरण सिंह यांची भेट घेऊन मागणी केली.
       यावर, हिंदकेसरी स्पर्धा ही न्यायालयीन कचाट्यात अडकली असल्याने तितकीच प्रतिष्ठित अशी राष्ट्रीय पातळीवरील मातीतील कुस्ती स्पर्धांचे आयोजन करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना दिली. यामुळे, छत्रपती शाहू महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच कुस्ती या खेळालाही त्याचा भरीव फायदा होईल, असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
      याविषयी बोलताना खा. संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, उत्तरप्रदेशचे रहिवासी असलेले श्री बृजभूषण हे स्वतः एक उत्तम मल्ल आहेत. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी कुस्तीसाठी दिलेले योगदान हे त्यांना चांगलेच माहीत आहे. मी महाराजांच्या विचार कार्याबद्दल त्यांना माहिती देत असताना ते भारावून गेले. महाराजांप्रती त्यांच्या मनी असणारा आदरभाव व कृतज्ञता त्यांच्या बोलण्यातून दिसून आली.
       यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी खासदार बृजभूषण शरण सिंह यांना छत्रपती शाहू महाराजांचा हिंदी भाषेतील चरित्र ग्रंथ भेट दिला.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!