कोल्हापूर • प्रतिनिधी
राजर्षी शाहू महाराजांचे विचार तर अजरामर आहेतच, पण त्यांच्या प्रतिमेचे दर्शनही प्रेरणादायी असल्याने एक नव्या संकल्पनेतून शाहू महाराजांची शिल्परूपातून प्रतिमा शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर (स्मॅक) ने साकारली आहे.
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर या मूर्तीचे अनावरण व पूजन उद्योगपती दीपक बापूसाहेब जाधव यांचे हस्ते स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मॅक भवन येथे करण्यात आले.
यावेळी स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील यांनी मूर्ती निर्मिती मागील भूमिका विशद केली. ते म्हणाले की, शाहूंची प्रतिमा ही देखील त्यांच्या विचारा इतकीच प्रेरणादायी आहे, म्हणून स्मॅकद्वारे सन्मानित होणाऱ्या मान्यवरांना ही मूर्ती भेट दिली जाणार आहे.
सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा राजा ही त्या प्रतिमेशी सुसंगत असणारी ही शिल्पकृती आहे.
ते पुढे म्हणाले की, तरुण शिल्पकार ओंकार कोळेकर यांनी हे शिल्प इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्या मार्गदर्शनातून तयार केले आहे. ही शिल्पाकृती फायबरमध्ये असून यातील शाहू महाराज फेटा आणि शिकारीच्या कोटातील आहेत. शिल्पाखाली शाहू महाराजांचे उद्योगा विषयीचे विचार – ” उद्योग व व्यापार करण्याचे साहस जर आपण केले नाही तर आपल्या सर्व चळवळी निस्तेज होतील ” व त्यांचा कार्यकाल नमूद करण्यात आला आहे.
उद्योगपती नारायण बुधले म्हणाले की, छत्रपतींविषयी आदरभाव निर्माण होण्यासाठी स्मॅकने सुरू केलेले हे आगळेवेगळे कार्य कौतुकास्पद आहे.
यावेळी राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनपटावरील चित्रफीत दाखविण्यात आली. याप्रसंगी उद्योगपती दीपक जाधव, चंद्रशेखर डोली, नारायण बुधले व बदाम पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते शाहू महाराजांची मूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले. मूर्तिकार ओंकार कोळेकर यांचा सत्कार अतुल पाटील यांनी केला.आभार प्रदर्शन दीपक पाटील यांनी मानले.
कार्यक्रमास स्मॅकचे ऑ. सेक्रेटरी जयदीप चौगले, ट्रेझरर एम. वाय. पाटील, स्मॅक आयटीआय चेअरमन राजू पाटील, सेमिनार कमिटी चेअरमन अमर जाधव, संचालक प्रशांत शेळके, स्वीकृत संचालक भरत जाधव, निमंत्रीत सदस्य रवी डोली, उद्योगपती सचिन बुधले आदी उपस्थित होते