कोल्हापूर • प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठाच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा प्राचार्य रा.कृ. कणबरकर राष्ट्रीय पुरस्कार शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांना जाहीर करण्यात आला. प्राचार्य कणबरकर यांच्या स्मृतीदिनी (दि. १३ एप्रिल) दुपारी ४:०० वाजता विद्यापीठाच्या परिसरात पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी पत्रकार परिषदेत केली.
कुलगुरू डॉ. शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू (स्व.) प्राचार्य रा.कृ. कणबरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार निर्मितीसाठी त्यांच्या कुटुंबियांनी शिवाजी विद्यापीठाकडे २५ लाख रुपयांची ठेव प्रदान केली आहे. श्रीमती शालिनी कणबरकर यांच्यासमवेत झालेल्या सामंजस्य करारातून शिवाजी विद्यापीठाच्या या माजी कुलगुरूंच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कारा’ची संयुक्त निर्मिती करण्यात आली. देशातील शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच अन्य क्षेत्रांत अत्युत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तीला प्राचार्य कणबरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी पुरस्कार देण्यात येतो. रुपये १ लाख ५१ हजार रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
यापूर्वी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. सी.एन.आर. राव (२०१६), रयत शिक्षण संस्था (२०१७), ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल (२०१८) आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन.डी. पाटील (२०१९) यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सन २०२० व २०२१मध्ये कोविड-१९च्या साथीमुळे पुरस्कार जाहीर करण्यात येऊ शकले नाहीत.
यावेळी पुरस्कारासंदर्भात अधिक माहिती देताना कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले की, शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांचे आधुनिक महाराष्ट्राच्या शैक्षणिक विकासात अतिशय महत्त्वाचे योगदान आहे. राज्याबरोबरच देशाच्या शैक्षणिक विकासासाठी त्यांनी अत्यंत ध्येयनिष्ठपणे योगदान दिले आहे. व्यावसायिक शिक्षणाचा विकास व विस्तार यांसाठी त्यांनी अव्याहत परिश्रम घेतले आहेत. त्यातून डी.वाय. पाटील समूहाचा शैक्षणिक वृक्ष साकारला आहे. व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवाहात सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांचे समावेशन डॉ. पाटील यांच्यामुळे शक्य झाले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, शोध समितीचे सदस्य डॉ. जे.एफ. पाटील, प्राचार्य डॉ. बी.ए. खोत, डॉ. भालबा विभूते, डॉ. अरुण कणबरकर आदी उपस्थित होते.