महाराष्ट्राला आदर्शवत शिवसंपर्क अभियान कोल्हापूरातील शिवसैनिकांनी राबवावे: मंत्री सामंत


कोल्हापूर • प्रतिनिधी
     शिवसेनेने आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी केलेले काम तळागाळापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी शिवसैनिकांची असून, शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून प्रभागनिहाय शाखांची स्थापना करावी. या शाखांच्या माध्यमातून सर्वसामन्य नागरिकांचे प्रश्न सोडवावेत. येत्या १२ दिवसात महाराष्ट्रात आदर्शवत शिवसंपर्क अभियान कोल्हापुरातील शिवसैनिकांनी राबवावे, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शिवसैनिकांना दिल्या. शिवसेनेने राज्यभरात सुरु केलेल्या शिवसंपर्क अभियानाची सुरवात आज कोल्हापूर शहरात शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या शिवसंपर्क मेळाव्याने करण्यात आली. या मेळाव्यात उपस्थित शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शिवसंपर्क प्रतिज्ञा देत शिवसंपर्क अभियान राबविण्याचे अभिवादन दिले.
     मेळाव्या सुरवातीस युगपुरुषांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले की, अंगावर आले कि शिंगावर घेण्याची शिकवण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे. आम्ही कोणाकडे शिंग घेवून मारायला जात नाही. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कृतीतून उत्तर देत आहेत. महाराष्ट्र राज्य परंपरा जपणारे राज्य आहे आणि कुटुंबप्रमुखाच्या परंपरेप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेची काळजी घेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्याची दखल जगभराने घेतली, तशीच दखल पंतप्रधानानीही घेतली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या  लोकप्रियतेचा धसका घेवून विरोधकांनी शिवसेनेला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे. पण, शिवसंपर्क अभियानाच्या या १२ दिवसाच्या काळात शिवसेनेचे भगवे वातावरण निर्माण करून विरोधकांचे १२ वाजविल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाहीत. विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्याची गरज नाही, आपल्या कार्यातून विरोधकांची तोंड बंद करण्याचा हातखंडा शिवसेनेत आहे.
     यावेळी बोलताना शिवसेना संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशांनुसार शहरातील ८१ प्रभागात शिवसंपर्क अभियान राबवा. अभियानाच्या माध्यमातून शाखाप्रमुख, गटप्रमुखांची नियुक्ती करा. त्यांच्या माध्यमातून लोकांच्या समस्या जाणून घेवून त्या वरिष्ठांपर्यंत पोहचवा. शिवसेनेत काम केलेल्या जेष्ठांना मान-सन्मान द्या, त्या जाणकार फळीची मदत लोकसंपर्कात घ्या. जागृत व्हा, अन्यथा पक्षाशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही.
     राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी दिवसाचे २४ तास काम करून अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. १९९५ मध्ये सत्ता आल्यानंतर अनेक विकासाची कामे लोकांच्या पर्यंत पोहचविण्यात कमी पडल्याने १९९९ ला पराभव झाला. तशीच स्थिती यावेळी झाली मित्रपक्षाच्या घातासह अनेक विकासात्मक कामे करूनही संपर्क कमी पडल्याने शिवसेनेचा पराभव झाला. पण, पराभवाने न थांबता शिवसेनेने आपले काम अखंडित सुरु ठेवले आहे. पुढील काळात आणखी ताकतीने काम करू आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवू, असे प्रतिपादन केले.
     यावेळी माजी आ. डॉ.सुजित मिणचेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, पानपट्टी सेनेचे जिल्हाध्यक्ष अरुण सावंत, युवासेनेचे हर्षल सुर्वे आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक अंकुश निपाणीकर आणि आभार शिवसेना उपशहरप्रमुख जयवंत हारुगले यांनी मानले.
     मेळाव्यास आमदार प्रकाश आबिटकर, माजी आ. सत्यजित पाटील सरूडकर, शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख मंगलताई साळोखे, ऋतुराज क्षीरसागर, तुकाराम साळोखे, सुनील जाधव, रणजीत जाधव, किशोर घाटगे, रघुनाथ टिपुगडे,  युवासेनेचे चेतन शिंदे, अविनाश कामते, पियुष चव्हाण, विश्वदीप साळोखे आदी मान्यवर उपस्थित होते.       
——————————————————- Attachments areaReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *