कोल्हापूर • प्रतिनिधी
चुरशीने खेळल्या गेलेल्या सामन्यात शिवाजी तरूण मंडळने बालगोपाल तालीम मंडळवर २-०ने केली. सलग दुसऱ्या विजयाने शिवाजीच्या गुणतक्त्यात एकूण सहा गुणांची नोंद झाली. उत्कृष्ट खेळाडूचा बहूमान योगेश कदम यास मिळाला.
शिवाजी पेठेतील झुंजार क्लब आणि फॉर्म्युला थ्री रेसर कृष्णराज महाडिक यांच्यावतीने आयोजित के.एम. चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. स्पर्धेत रविवारी शिवाजी तरूण मंडळ आणि बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात सामना झाला. पूर्वार्धात ३० व्या मिनिटास योगेश कदमने गोल केला. सुमित जाधवने फ्री किकवर मारलेल्या चेंडूला योगेशने गोलजाळ्याची दिशा दाखवली व संघाला आघाडी मिळवून दिली. गोलची परतफेड करण्यासाठी बालगोपालच्या रोहित कुरणे, ऋतुराज पाटील, अभिनव साळोखे यांनी खोलवर चढाया केल्या पण त्यांना गोल करण्यात अपयश आले. शिवाजीकडून गोलची आघाडी वाढवण्यासाठी करण चव्हाण, संकेत साळोखे, सुयश हांडे, योगेश कदम यांनी केलेल्या जोरदार चढाया वाया गेल्या. अखेर जादावेळेत झालेल्या चढाईत संकेत साळोखेने गोल नोंदवून शिवाजीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
सुपरलिगचे सामने दुपारी ४ वाजता…..
दि.२५: फुलेवाडी – दिलबहार
दि.२६: शिवाजी – फुलेवाडी
दि.२७: बालगोपाल – दिलबहार