१९ वर्षांनी ‘शिवाजी’ लिग चॅम्पियन!
• टॉसवर दिलबहार उपविजेता तर पीटीएम तृतीय क्रमांक
कोल्हापूर • प्रतिनिधी
शिवाजी-पीटीएम सामना पूर्णवेळेत गोलशून्य बरोबरीत सुटल्याने सर्वाधिक १४ गुणांची आघाडी घेऊन शिवाजी तरूण मंडळने “लिग चॅम्पियन”च्या बहूमानावर शिक्कामोर्तब केले. शिवाजी तरूण मंडळने १९ वर्षांनंतर “लिग चॅम्पियन” होण्याचे स्वप्न साकारले. पीटीएम (अ) आणि दिलबहारचे समान १३ गुण तसेच गोलफरकही (+३) समान झाल्याने उपविजेतेपदासाठी टॉस झाला. टॉस दिलबहारने जिंकून उपविजेतेपदाला गवसणी घातली तर पीटीएम (अ)ला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.
दरम्यान, सिनियर-८ गटात सर्वांत कमी गुण मिळाल्याने खंडोबा (ब) आणि पीटीएम (ब) संघाची मानांकनात घसरण झाल्याने दोन्ही संघ ज्युनिअर झाले.
केएसए चषक वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेतील शिवाजी – पीटीएम (अ) सामन्याबद्दल सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली होती. हा सामना पाहण्यासाठी छत्रपती शाहू स्टेडियमवर सुमारे पंधरा हजार प्रेक्षकांनी उपस्थिती लावली. फुटबॉल शौकिनांच्या लक्षवेधी उपस्थितीमुळे सुमारे दोन लाख रुपयांची तिकीट विक्री झाली. बलाढ्य संघात सामना होत असल्याने सामन्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शिवाजी-पीटीएम सामन्यात दोन्ही संघांकडून खोलवर चढाया झाल्या परंतु गोलची नोंद झाली नाही. पीटीएमकडून ऋषिकेश मेथे-पाटील तर शिवाजीच्या करण चव्हाण-बंदरेने गोलची अत्यंत सोपी संधी दवडली. पूर्णवेळेत गोलफलक कोराच राहिला. अखेर सामना बरोबरीत राहिल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. या गुणासह शिवाजीने सर्वाधिक १४ गुणांची आघाडी घेऊन “लिग चॅम्पियन” चा बहूमान मिळवला. सन २००३-०४ नंतर १९ वर्षांनी ‘शिवाजी’ने जेतेपद मिळवून केएसए चषकावर नांव कोरले आहे.
उपविजेतेपदासाठी पीटीएम (१३गुण) आणि दिलबहार (१३गुण) दावेदार झाले. समान गुण व समान गोलफरक असल्याने याचा निकाल टॉसवर देण्यात आला. टॉसवर दिलबहारने बाजी मारून उपविजेतेपदाला गवसणी घातली. पीटीएम तृतीय क्रमांकावर पोहोचले.
सिनियर सुपर-८ गटात सर्वोत्कृष्ट कामगिरी करत शिवाजी तरूण मंडळने विजेतेपद पटकावले. तसेच सिनियर -८ गटात खंडोबा तालीम मंडळ (ब) आणि पीटीएम (ब) या संघांनी सुमार कामगिरी केली. खंडोबा (ब)ने ४ गुण तर पीटीएम (ब)ने ६ गुण मिळवले. या गटात सर्वांत कमी गुण झाल्याने दोन्ही संघांच्या मानांकनात घसरण होऊन ज्युनिअर होण्याची नामुष्की ओढवली. आता खंडोबा (ब) आणि पीटीएम (ब) हे संघ केएसए कनिष्ठ ब गटात गेले.
——————————————————-