शिवाजी विद्यापीठातील क्रीडा सुविधा विद्यार्थ्यांसाठी खुल्या करण्याचा निर्णय


कोल्हापूर • प्रतिनिधी
      केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन यांच्याकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या कोविड-१९च्या निकष, नियमावलीच्या अधीन राहून शिवाजी विद्यापीठातील क्रीडा सुविधा विद्यापीठाच्या क्रीडापटूंना ओळखपत्र दाखवून सरावासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिली आहे.
     डॉ. नांदवडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा विभागाकडील सुविधा कोविड-१९ महामारीच्या अनुषंगाने शासनामार्फत करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सरावासाठी बंद ठेवण्यात आलेल्या होत्या. तथापि, सध्या सर्वत्र टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे आणि विद्यापीठाच्या क्रीडापटूंकडून होत असलेल्या मागणीचा विचार करता विद्यापीठाच्या जीमसह क्रीडा सुविधा क्रीडापटूंसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. क्रीडापटूंना ओळखपत्र दाखविल्यानंतरच या सुविधांचा लाभ घेता येईल तसेच कोविड-१९संदर्भात वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक राहील.
     तसेच, सध्या एम.फील. व प्रि-पीएच.डी. कोर्सवर्कच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास त्यांना विद्यापीठामार्फत वसतीगृह नियमांचे पालन करून निवासाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी कळविले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *