शिवाजी – फुलेवाडी सामना बरोबरीत

Spread the love

• शिवाजी अंतिम फेरीत ; फुलेवाडीचे आव्हान संपुष्टात
कोल्हापूर • प्रतिनिधी
      झुंजार क्लब आणि फॉर्म्युला थ्री रेसर कृष्णराज महाडिक यांच्यावतीने आयोजित के.एम. चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी शिवाजी तरूण मंडळ आणि फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. शिवाजीचा बचावपटू विशाल पाटील सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू ठरला. स्पर्धेच्या सुपरलिगमध्ये ‘शिवाजी’ने सर्वाधिक ७ गुण मिळवून अंतिम फेरीत धडक मारली तर फुलेवाडीचे २ गुण असल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
      दरम्यान, दिलबहार आणि बालगोपाल यांच्यात बुधवारी (दि.२७) होणारा सामना महत्वपूर्ण ठरणार आहे. या सामन्यात विजयी होणारा संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. दिलबहारचे ३ गुण असल्याने त्यांना या सामन्यात बरोबरी पुरेशी आहे, पण बालगोपालला मात्र विजय प्राप्त करणे आवश्यक आहे. बालगोपालच्या खात्यावर एक गुण आहे. अंतिम फेरी गाठण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वपूर्ण आहे.
      छत्रपती शाहू स्टेडियमवर मंगळवारी झालेला शिवाजी-फुलेवाडी सामना कंटाळवाणा झाला. दोन्ही संघाकडून गोल नोंदवण्यासाठी झालेल्या काही चढाया वगळता सामन्यात निराशाजनक खेळ झाला. शिवाजीच्या रोहन आडनाईकने मारलेल्या फ्री किकवर चेंडू गोलपोस्टला धडकला. त्याच्यासह करण चव्हाण, संकेत साळोखे, योगेश कदम यांनी केलेल्या खोलवर चढाया समन्वयाअभावी वाया गेल्या. फुलेवाडीकडून चंदन गवळी, तेजस जाधव, मंगेश दिवसे यांना फिनिशिंगअभावी गोल करण्यात अपयश आले. गोलरक्षक जिगर राठोडने काही फटके परतावून लावत गोलचे संकट रोखले. अखेर पूर्णवेळेत सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!