• खंडोबा(ब), पीटीएम(ब), उत्तरेश्वर, सम्राटनगरचे स्थान धोक्यात?
कोल्हापूर • प्रतिनिधी
यंदाचा “लिग चॅम्पियन” कोण होणार, याची उत्सुकता फुटबॉलशौकिनांना लागली असली तरी शिवाजी तरूण मंडळ आणि पीटीएम (अ) या लढतीतूनच “लिग चॅम्पियन”चा फैसला होणार आहे. त्यामुळे २४ मार्चला होणाऱ्या या लढतीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तसेच वरिष्ठ गटातील स्थान अबाधित राखण्यासाठी खंडोबा तालीम मंडळ (ब), पीटीएम (ब), उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ व सम्राटनगर स्पोर्टस या संघांना अस्तित्वासाठी झगडावे लागणार आहे. या संघांचे कमी गुण असल्यामुळे वरिष्ठ गटातील स्थान धोक्यात येऊ शकते. वरिष्ठ गटातील स्थान अबाधित राखण्यासाठी त्यांना सातव्या फेरीतील सामना महत्वाचा आहे.
केएसए चषक वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेच्या सहा फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. सिनियर सुपर-८ गटात सर्वोत्कृष्ट कामगिरी करत “लिग चॅम्पियन”चा बहुमान पटकावण्यासाठी चढाओढ आहे. सर्वाधिक गुण मिळविणारे दोन संघ गुणानुक्रमे विजेता व उपविजेता ठरतील. शिवाजी आणि पीटीएम (अ) संघात जेतेपदासाठी चुरस असून ‘शिवाजी’चे १३ तर पीटीएमचे १२ गुण आहेत. २४ मार्चला शिवाजी-पीटीएम लढत होईल. यामध्ये ‘शिवाजी’ला विजय किंवा बरोबरी पुरेशी आहे पण पीटीएमला मात्र विजय मिळविणे आवश्यक आहे. ‘जर-तर’चा विचार करता या लढतीतील निकालावरून उपविजेता कोणता संघ होईल, याबाबतही उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. याठिकाणी दिलबहार (१०गुण), बीजीएम स्पोर्टस (१०गुण) यांचा प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्याचा निकाल महत्वपूर्ण ठरणार आहे. गुण समान झाले तर कदाचित गोलफरक निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
सिनियर-८ गटात वरिष्ठ गटातील स्थान अबाधित राखण्यासाठी अर्थात कनिष्ठ गटात होणारी गच्छंती टाळण्यासाठी सर्वात कमी गुण असणाऱ्या संघांना धडपड करावी लागणार आहे. त्यांना अखेरच्या सामन्यात चांगली कामगिरी करून गुणसंख्या वाढवावी लागेल, अन्यथा गटातील स्थान धोक्यात येऊ शकते. सर्वांत कमी गुण असलेले दोन संघ केएसए कनिष्ठ ब गटात जातील.
या गटात ऋणमुक्तेश्वरने उत्कृष्ट कामगिरी करत सर्वाधिक १३ गुण मिळवले आहेत. कोल्हापूर पोलिस फुटबॉल संघ १२ गुणांवर आहे. खंडोबा (ब)चे सर्वात कमी ४ गुण आहेत. पीटीएम (ब) ६ गुण तर उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ आणि सम्राटनगर स्पोर्टस यांनी प्रत्येकी ७ गुण प्राप्त केले आहेत. कमी गुण असलेल्या या संघांचे स्थान धोक्यात येऊ शकते. उर्वरित सामन्याचा निकाल काय लागणार, यावरच या संघांचे भवितव्य अवलंबून आहे. गुण वाढून वरिष्ठ गटातील स्थान अबाधित राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. शेवटी गुणानुक्रमे खालच्या स्थानावर असलेले दोन संघ मात्र कनिष्ठ गटात जातील.
सातव्या फेरीतील सामने…..
• दि.२१: झुंजार क्लब – सम्राटनगर स्पोर्टस
खंडोबा (अ) – बीजीएम स्पोर्टस
• दि.२३: उत्तरेश्वर – ऋणमुक्तेश्वर
बालगोपाल – दिलबहार
• दि.२४: पोलिस संघ – पीटीएम (ब)
पीटीएम (अ) – शिवाजी
• दि.२५: खंडोबा (ब) – जुना बुधवार
प्रॅक्टीस – फुलेवाडी