केएसए चषक स्पर्धेत ‘शिवाजी’ अव्वल!

Spread the love

• दिलबहार उपविजेता, पीटीएम तिसरा व बीजीएम चौथा क्रमांक
कोल्हापूर • प्रतिनिधी
      केएसए चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करत शिवाजी तरुण मंडळने १४ गुणांसह अव्वलस्थान राखत “लिग चॅम्पियन”चा बहूमान मिळवला. उपविजेतेपदासाठी दिलबहार आणि पीटीएम संघाचे समान १३ गुण झाल्याने टॉस करण्यात आला. दिलबहारने टॉस जिंकून उपविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. पीटीएम तिसऱ्या तर बीजीएम १० गुणांसह चौथ्या क्रमांकावर राहिले.
      दरम्यान, शुक्रवारी झालेल्या सामन्यात संयुक्त जुना बुधवार पेठने खंडोबा तालीम मंडळ (ब)वर ६-२ गोलने विजय मिळवला. प्रॅक्टीस फुटबॉल क्लब आणि फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यातील सामना २-२ असा बरोबरीत राहिला.
       केएसए चषक स्पर्धेचा आज सायंकाळी छत्रपती शाहू स्टेडियमवर बक्षीस समारंभाने समारोप झाला. स्पर्धेचा लिग चॅम्पियन शिवाजी तरूण मंडळला रोख एक लाख रुपये व चषक तर उपविजेत्या दिलबहार तालीम मंडळास ७५ हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच पीटीएमला तिसऱ्या क्रमांकाचे ५० हजार रुपये व चषक आणि चौथ्या क्रमांकावरील बीजीएम स्पोर्टसला २५ हजार रुपये व चषक प्रदान करण्यात आले. केएसएचे पेट्रन इन चिफ श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, पालकमंत्री सतेज पाटील, केएसएचे अध्यक्ष व विफाचे उपाध्यक्ष श्रीमंत मालोजीराजे छत्रपती आणि ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या महिला समिती सदस्य व विफाच्या महिला फुटबॉल समिती चेअरमन सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते स्पर्धेचा बक्षीस समारंभ पार पडला. यावेळी अरूण नरके, पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, केएसए जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे यांच्यासह केएसएचे राजेंद्र दळवी, नितीन जाधव, मनोज जाधव, संभाजीराव मांगोरे-पाटील, दीपक राऊत, दीपक उर्फ भाऊ घोडके आदी उपस्थित होते.
      दरम्यान, महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा पुरूष (खुला गट) फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत केएसए कोल्हापूर जिल्हा संघ सलग तिसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल संघातील खेळाडू, प्रशिक्षक व संघव्यवस्थापक यांना प्रत्येकी ११ हजार रुपये देऊन सत्कार करण्यात आला.
                   स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू…..
       केएसए चषक वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना प्रत्येकी ११ हजार रुपये व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
• फॉरवर्ड : करण चव्हाण-बंदरे (शिवाजी)
• हाफ : रोहन दाभोळकर (दिलबहार)
• डिफेन्स : अक्षय पायमल (पीटीएम)
• गोलकीपर : मयुरेश चौगुले (शिवाजी) 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!