शिवाजी विद्यापीठ ‘अ++’ मिळविणारे देशातील अवघे दुसरे राज्य विद्यापीठ

Spread the love

• राष्ट्रीय स्तरावर केवळ सात संस्था ‘अ++’ मानांकित
कोल्हापूर • प्रतिनिधी
      ‘नॅक’ (बंगळुरू) यांचेकडून सन २०१८पासून आजपर्यंत राष्ट्रीय पातळीवर केवळ सात संस्थांना ‘अ++’ मानांकन प्राप्त झाले असून त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाचा समावेश झाला आहे. त्याचप्रमाणे असे मानांकन मिळविणारे शिवाजी विद्यापीठ अवघे दुसरे राज्य अकृषी विद्यापीठ ठरले आहे. ही माहिती शिवाजी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. एम.एस. देशमुख यांनी दिली आहे.
    डॉ. कामत व देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषद (नॅक) यांचेकडून प्राप्त झालेल्या यादीमध्ये सन २०१८ पासून ‘अ++’ मानांकन मिळविणाऱ्या राष्ट्रीय स्तरावर केवळ सात उच्चशिक्षण संस्था आहेत. त्यामध्ये अवघी दोन राज्य विद्यापीठे आहेत. तमिळनाडूमधील मदुराई कामराज विद्यापीठ आणि येथील शिवाजी विद्यापीठ अशा दोन विद्यापीठांचा त्यात समावेश आहे. यातील मदुराई कामराज विद्यापीठाचे सीजीपीए गुणांकन ३.५४ इतके आहे, तर शिवाजी विद्यापीठाचे ३.५२ इतके आहे. उर्वरित पाचांत बेंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आय.आय.एस.सी.) ही एकमेव केंद्रीय संस्था आहे, तर बनस्थळी विद्यापीठ (राजस्थान), रामकृष्ण मिशन विवेकानंद एज्युकेशनल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (पश्चिम बंगाल), कोनेरु लक्ष्मैय्या एज्युकेशन फाऊंडेशन (आंध्र प्रदेश) आणि एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (चेन्नई, तमिळनाडू) या डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी दर्जाच्या शैक्षणिक संस्था आहेत.
           गुणवत्तेचा चढता क्रम…….
      शिवाजी विद्यापीठाने ‘नॅक’च्या चार फेऱ्यांना सामोरे जात असताना सातत्याने आपली गुणवत्ता उंचावत नेल्याचे दिसून येते. सन २००४मध्ये शिवाजी विद्यापीठ पहिल्यांदा नॅकच्या मूल्यांकनास सामोरे गेले, त्यावेळी विद्यापीठास ७७.७५ (ऑन द स्केल ऑफ १००) सीजीपीए गुणांकनासह ‘ब+’ मानांकन प्राप्त झाले. सन २००९ साली २.८५ (ऑन द स्केल ऑफ ४) सीजीपीए गुणांकनासह ‘ब’ मानांकन प्राप्त केले. सन २०१४मध्ये ३.१६ सीजीपीए गुणांकनासह ‘अ’ मानांकन प्राप्त केले, तर यंदा अधिक चमकदार कामगिरीचे प्रदर्शन करीत ३.५२ गुणांकनासह ‘अ++’ मानांकन प्राप्त केले आहे, अशी माहितीही डॉ. कामत यांनी दिली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!