शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्रज्ञांकडून स्तनांच्या कर्करोगावरील औषधाबाबत महत्त्वपूर्ण संशोधन

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
       शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्रज्ञांनी स्तनांच्या कर्करोगाबाबत सर्वसामान्य पेशींना अपाय न करता केवळ कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करणाऱ्या औषधाविषयी यशस्वी संशोधन केले असून नुकतेच त्याचे भारतीय पेटंट या शास्त्रज्ञांना प्राप्त झाले आहे. रसायनशास्त्र अधिविभागातील संशोधक डॉ. गजानन राशिनकर आणि त्यांचे विद्यार्थी डॉ. प्रकाश बनसोडे यांनी ही बहुमोल कामगिरी केली आहे.
           काय आहे संशोधन ……
     डॉ. राशिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बनसोडे यांनी “सिंथेटिक स्टडीज इन न्यू अँटीकॅन्सर थेराप्युटिक्स” या विषयावर पी.एच.डी.चे संशोधन केले. कर्करोगावरील केमोथेरपी उपचारांमध्ये चांदी, सोने व प्लॅटिनम या राजधातूंना त्यांच्या विशिष्ट जैविक गुणधर्मांमुळे विशेष महत्व आहे; परंतु या धातूंचे सामान्य पेशींवरही दुष्परिणाम होतात. तसेच कर्करोगावरील औषधेही सामान्य पेशी व कर्करोगाच्या पेशी यात फरक करण्यास असमर्थ ठरतात. यामुळे  रुग्णांना केमोथेरपी उपचारांदरम्यान या औषधांच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. स्तनांच्या कर्करोगावर उपयुक्त टॅमॉक्सीफेन या औषधाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी व उपचाराची उपयुक्तता वाढविण्यासाठी फेरोसीन हा घटक वापरून फेरोसीफेन हे उपयुक्त औषध तयार करण्यात संशोधकांना यश आले आहे़. फेरोसिन हा घटक मानवी शरीरास अपायकारक नाही,  हे या संशोधनातून सिद्ध झाले आहे़. त्यामुळे फेरोसीनचा वापर करून स्तनांच्या कर्करोगावर अत्यंत प्रभावी व सुरक्षित औषध विकसित करता येईल  या हेतूने डॉ. बनसोडे यांनी डॉ. राशिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली “फेरोसीन लेबल्ड एन-हेटरोसायक्लिक कारबिन कॉम्प्लेक्स ऑफ सिल्वर, गोल्ड अँड प्लॅटिनम” या विषयावर संशोधन पूर्ण केले. सदर संशोधनात त्यांनी फेरोसीन तसेच एन- हेटरोसायक्लिक कारबिन या घटकांचा वापर करून चांदी, सोने व प्लॅटिनम यांची एकूण दहा संयुगे (कॉम्प्लेक्स) प्रयोगशाळेत तयार केली. रसायनशास्त्रातील विविध तंत्रज्ञानाचा वापर करून सदर संयुगांची रचना अभ्यासली़. टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल यांच्या ॲडव्हान्स्ड सेंटर कॅन्सर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन, नवी मुंबई  येथे स्तनांच्या कर्करोगाच्या पेशींवर या संयुगांची चाचणी करण्यात आली. या चाचणीच्या अहवालात असे आढळून आले की, ही संयुगे कर्करोगाच्या पेशींना पूर्णपणे नष्ट करतात; परंतु शरीरातील सामान्य पेशींना मात्र अपाय करीत नाहीत. इतकी ती सुरक्षित आहेत़.
     संशोधनाला भारतीय पेटंट प्रदान…..
     डॉ. राशिनकर यांनी या महत्त्वपूर्ण संशोधनाची १४ मार्च २०१८ रोजी भारतीय पेटंटसाठी नोंदणी केली होती. विविध स्तरांवरील शास्त्रीय व पेटंट कायदे विषयक परीक्षणानंतर भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने २२ जानेवारी २०२१ रोजी या संशोधनाचे पेटंट डॉ. गजानन राशिनकर व डॉ. प्रकाश बनसोडे यांना प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र दिले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!