शिवाजी विद्यापीठात ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर’ उपक्रमाची तयारी पूर्ण

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून सोमवारी (दि.२५) शिवाजी विद्यापीठात होत असलेल्या ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर’ या उपक्रमाची  ती सर्व तयारी शिवाजी विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मंत्री सामंत यांच्या या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसह उच्चशिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घटकांच्या अडी-अडचणी सोडविल्या जाणार असल्यामुळे या उपक्रमाचे या घटकांनी स्वागत केले आहे. या उपक्रमासाठी सुमारे ९०० ऑनलाईन निवेदने सादर झाली आहेत.
      राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय आपल्या विभागात’ हा अभिनव उपक्रम घोषित केला. या उपक्रमाची सुरवात सोमवारी सकाळी ११ वाजता शिवाजी विद्यापीठात ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर’ने होणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्याचा निर्धार करून विद्यापीठ प्रशासनाने त्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहामध्ये मंत्री श्री. सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम होणार आहे.
     या उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या घटकांना निवेदने सादर करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने ऑनलाईन पोर्टल निर्माण केले आहे. त्याला उत्तम प्रतिसाद लाभला असून सायंकाळपर्यंत सुमारे ९०० व्यक्ती, संस्थांनी आपली ऑनलाईन निवेदने सादर केली आहेत.
     दरम्यान, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील यांनी राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहास भेट देऊन तेथील तयारीची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला.
     शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर’ या उपक्रमासाठी कोविड-१९ साथीच्या अनुषंगाने शासन तथा युजीसी यांनी जारी केलेल्या निर्देशांचे पालन करीत मंत्री महोदयांसाठी खुला कक्ष उभा करण्यात आला आहे. सुरक्षित शारिरीक अंतर राखून मंत्री महोदयांना संबंधित व्यक्ती, संस्था आदींचे प्रतिनिधी यांचे गाऱ्हाणे ऐकता येईल, त्यावर तोडगा काढता येईल, या पद्धतीने या सभागृहात मंत्र्यांसह लोकप्रतिनिधी, सचिव, आयुक्त तसेच अन्य सर्व अधिकारी, कर्मचारी व अभ्यागत यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या वतीने सॅनिटायझर, ताप तपासणी आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. येणाऱ्या प्रतिनिधींनी मास्क लावणे व सुरक्षित शारिरीक अंतर यांचे पालन करावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी केले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!