शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी.एस.पाटील जागतिक शास्त्रज्ञांमध्ये अव्वलस्थानी

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     एडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या जागतिक सर्वेक्षणात शिवाजी विद्यापीठाकडून प्र-कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील यांना शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये अव्वलस्थान मिळाले आहे.
या आधीही अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. पाटील यांना जागतिक क्रमवारीत टॉप २% शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये स्थान मिळाले होते. तसेच करिअर ३६० या शैक्षणिक संस्थेकडून घेण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार डॉ.पाटील यांनी भारतातील टॉप टेन शास्त्रज्ञांमध्ये स्थान प्राप्त केले होते.
     डॉ.पाटील यांनी शिवाजी विद्यापीठात वैज्ञानिक क्रांती घडवून आणून ७० हुन अधिक वैज्ञानिक त्यांनी घडविले आहेत. ज्ञानदानाबरोबर ज्ञाननिर्मितीवर त्यांनी जास्त भर दिला.
सौर घट, गॅस सेन्सिंग, सुपरकॅपॅसिटर या क्षेत्रात त्यांनी संशोधनाच्या माध्यमातून भरीव कामगिरी केली आहे. प्रा.पाटील व त्यांची टीम यांना सौर घटाची कार्यक्षमता वाढविण्यामध्ये यश आले आहे. प्रा.पाटील हे गेली ३० वर्षे मटेरियल सायन्स या क्षेत्रात संशोधनाचे कार्य करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ४३ विद्यार्थ्यांनी पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे व ३ विद्यार्थ्यांनी आपला प्रबंध सादर केला आहे. आजवर त्यांनी आंतराष्ट्रीय स्तरावर ५१० हुन अधिक शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. तसेच त्यांच्या शोधनिबंधांना १९१३७ हुन अधिक सायटेशन अर्थातच त्यांच्या संशोधन कार्याचा संदर्भ १९१३७  हुन जास्त संशोधकांनी त्यांच्या शोधनिबंधांमध्ये दिला आहे. त्यांच्या नावावर समाजउपयोगी पाच पेटन्टस नोंद आहेत. त्यांचा एच इंडेक्स (h-index) ७३ असून आय टेन इंडेक्स (i -10-index) ३६२ इतका आहे. त्यांचे संशोधन लेख १ लाख ३५ हजारहून अधिक शास्त्रज्ञ तसेच संशोधक विद्यार्थ्यांनी अभ्यासले आहेत.संशोधन क्षेत्रावर त्यांनी पाच पुस्तकेही प्रकाशित केली आहेत.
      प्रा. पाटील यांनी वैयक्तिक स्तरावर आजवर भारत सरकारच्या विविध संस्थेकडून संशोधन प्रकल्पासाठी १० कोटीहून अधिक निधी मंजूर करून आणला आहे. त्यांनी  ”स्कुल ऑफ नॅनो सायन्स अँड टेकनॉलॉजी” या स्वतंत्र अधिविभागाची उभारणी करून या विभागाचे सलग ८ वर्षे नेतृत्व करीत शिवाजी विद्यापीठाला जागतिक संशोधनात मानाचे स्थान निर्माण करून दिले आहे. प्रा.पाटील यांनी सायन्स व टेक्नॉलॉजी या विभागाचे अधिष्ठाता म्हणून देखील उल्लेखनीय काम केले आहे. पदार्थविज्ञान विभागाचे विभागप्रमुख म्हणून त्यांची कारकीर्द खूपच आदर्शवत राहिली आहे. प्रशासनातील उल्लेखनीय कार्याचेच फलित डॉ.पाटील यांची प्र-कुलगुरू पदी निवड झाली. या पदावर काम करीत असतानाच अवघ्या ६ महिन्यातच नॅककडून विद्यापीठाला ‘ ए प्लस प्लस’ हा दर्जा प्राप्त झाला. त्यांनी प्र-कुलगुरू म्हणून आपली जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली आहे.
डॉ. पाटील यांनी आजवर हजारो विद्यार्थ्यांना पाठबळ देऊन त्यांच्यामध्ये संशोधन अभिवृत्ती निर्माण केली आहे. त्यांचे विद्यार्थी आज शास्त्रज्ञ म्हणून जगाच्या कानाकोपऱ्यात संशोधनाचे कार्य करीत आहेत.
      डॉ.पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे बागणी (ता.वाळवा) या छोट्याशा खेडेगावातून आलेल्या डॉ.सावंता माळी या विद्यार्थ्याला ” जगातील सर्वोत्कृष्ट प्रबंध ” (बेस्ट थेसिस इन द वर्ल्ड) हा पुरस्कार मिळाला आहे. सध्या डॉ. माळी देखील जागतिक क्रमवारीत टॉप २% शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये आहेत.
शिवाजी विद्यापीठात अध्यापन, संशोधन व प्रशासनामध्ये त्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. शिवाजी विद्यापीठाला सर्वोतोपरी अव्वल बनविण्यासाठी अविरत झटणाऱ्या या अष्टपैलू प्राध्यापकांचे विद्यापीठात प्र-कुलगुरूपदी असणे ही एक विद्यापीठासाठी गौरवास्पद बाब आहे.
———————————————–
 Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!