कोल्हापूर जिल्हा ग्रीन चँपियन पुरस्काराचे शिवाजी विद्यापीठ मानकरी

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      शिवाजी विद्यापीठ सन २०२१-२२चे ‘कोल्हापूर जिल्हा ग्रीन चँपियन’ पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. केंद्रीय उच्च शिक्षण मंत्रालयांतर्गत असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषदेमार्फत सदर स्पर्धा घेण्यात आली. ही माहिती परिषदेचे चेअरमन डॉ. डब्ल्यू. जी. प्रसन्न कुमार यांनी ई-मेलद्वारे विद्यापीठ प्रशासनाला दिली आहे.
      केंद्र सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषदेमार्फत दर वर्षी स्वच्छ कॅम्पस इन्स्टिट्यूशनल पुरस्कार प्रदान करण्यात येतात. याअंतर्गत जिल्हा स्तरापासून ते केंद्रीय स्तरापर्यंत विविध शैक्षणिक संस्थांच्या परिसराची स्वच्छता आणि हरितपणा या मूलभूत निकषांवर निवड करून त्यांना पुरस्कार प्रदान करून प्रोत्साहित करण्यात येते. शिवाजी विद्यापीठाने यंदा प्रथमच या स्पर्धेत सहभाग नोंदविला आणि गेल्या काही वर्षांत जलव्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात केलेल्या कामाच्या बळावर जिल्हा स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त केला आहे.
     या पुरस्कारासाठीच्या प्रमुख निकषांमध्ये जल व्यवस्थापन, सौर ऊर्जा वापर व ऊर्जा संवर्धन उपक्रम, हरितक्षेत्र व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन आणि भू-वापर व व्यवस्थापन यांचा समावेश होता.
      यासंदर्भात अधिक माहिती देताना प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने गेल्या काही वर्षांत राबविलेल्या जल व्यवस्थापन अभियानामुळे विद्यापीठ परिसर पाणी वापराच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेला आहे. दर मोसमात विद्यापीठ साधारण ३१ कोटी लीटर पाण्याचे संवर्धन करते. त्याचबरोबर दररोज ४ लाख लीटर सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून ते उद्यानांसाठी वापरले जाते. सौरऊर्जेचा वापरही विद्यापीठ टप्प्याटप्प्याने वाढवित आहे. सध्या एकूण वीज वापरापैकी १६ टक्के वीज ही सौरऊर्जेपासून मिळविली जाते. विद्यापीठाने आपल्या ८५३ एकर क्षेत्रावर वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. विद्यापीठ परिसरात विविध प्रजातींची १३ हजारांहून अधिक वृक्ष आहेत. यामुळे हा परिसर कोल्हापूर नगरीचे फुप्फुस म्हणून ओळखला जातो. गतवर्षी विद्यापीठाने १२०० रोपांची लागवड केली आहे. मियावाकी जंगल क्षेत्र विकसित करण्याचा प्रकल्प विद्यापीठ राबविते आहे. विद्यापीठ दररोज सरासरी ५७५ किलो घनकचऱ्याचे व्यवस्थापन यशस्वीरित्या करते. जैववैद्यकीय घनकचऱ्याचे व्यवस्थापनही विहीत निकषांनुसार केले जाते. पर्यावरण संवर्धनासाठी हरित विकास हा मूलमंत्र घेऊन विद्यापीठ वाटचाल करत आहे. या बळावरच विद्यापीठाला हे यश लाभले आहे.
             ‘ग्रीन प्रॅक्टीसेस’मध्ये सर्वच घटकांचे योगदान मोलाचे: कुलगुरू डॉ. शिर्के
     शिवाजी विद्यापीठाने जलसंवर्धनासह पर्यावरणपूरक संवर्धनशील हरित विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये विद्यापीठाचा अभियांत्रिकी व उद्यान विभाग देत असलेले योगदान लक्षणीय आहे. त्याचबरोबर परिसराच्या स्वच्छतेसह ग्रीन प्रॅक्टीसेस राबविण्याच्या बाबतीत येथे येणारे कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी आणि फिरावयास येणारे नागरिक हे सर्वच घटक अत्यंत सजग आणि दक्ष आहेत. या सर्वांमुळेच विद्यापीठ परिसराची हिरवाई आणि प्रेक्षणीयता अबाधित आहे. जिल्हा स्तरावर प्राप्त पुरस्कारासाठी या सर्वच घटकांचे अभिनंदन! या पुढील काळातही अशीच संवर्धनशील कामगिरी करीत राहण्याची प्रेरणाही या सर्वांना मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!