शिवाजी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ.मोहोळकर यांना ”मटेरियल सायन्स विशेषतज्ज्ञ” पुरस्कार जाहीर

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     जागतिक क्रमवारीत टॉप २ % शास्त्रज्ञांमध्ये असणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ.आण्णासाहेब मोहोळकर यांना व्हिनस इंटरनॅशनल या संस्थेमार्फत यावर्षीचा ”मटेरियल सायन्स विशेषतज्ज्ञ” पुरस्कार जाहीर करण्यात आला.
     या संस्थेमार्फत जगभरातून विविध क्षेत्रातून ५१ सदस्यांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये सायन्समधून १३ शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी डॉ. मोहोळकर हे महाराष्ट्रामधून एकमेव आहेत. 
     डॉ. आण्णासाहेब मोहोळकर यांना याआधी गतवर्षी अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने घेतलेल्या सर्वेक्षणात जागतिक क्रमवारीत टॉप २ % शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये स्थान मिळाले होते. तसेच यावर्षी एडी सायंटिफिक या संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात देखील ते जागतिक शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये अग्रस्थानी आहेत.
    डॉ. मोहोळकर यांनी मटेरियल सायन्स क्षेत्रात केलेल्या संशोधनाची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी संशोधन अभिवृत्ती निर्माण व्हावी व समाजातील प्रश्न घेऊन विज्ञान व संशोधनाच्या माध्यमातून ते सोडविण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेतात. डॉ. मोहोळकर हे नेहमीच मूलभूत व समाजपयोगी संशोधनाला प्राधान्य देतात. आपल्या मार्गदर्शनाने त्यांनी कित्येक गरीब होतकरू विद्यार्थ्यांना पोस्ट डॉक्टरेटसाठी परदेशी पाठवून विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या गुणवत्तेला चालना दिली आहे. ग्रामीण भागामध्ये विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.
     डॉ. मोहोळकर यांनी संशोधनामध्ये विविध विषयावर पेटंट मिळविले आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून पीएच. डी. पदवी घेतल्यानंतर दक्षिण कोरिया येथून पोस्ट डॉक्टरेट पदवी मिळविली. २००९ साली बॉईजकास्ट फेलो म्हणून भारतातून ७२ तर महाराष्ट्रातून २ जणांची निवड करण्यात आली होती त्यापैकी ते एक आहेत. त्यांनी आजवर १७५ हुन अधिक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध केले आहेत व तसेच त्याचा संदर्भ आधार जगभरातून ७८०० हुन अधिक संशोधकांनी आपल्या शोधनिबंधांमध्ये घेतला आहे. सध्या ते जगभरातील टॉप जर्नल्सचे संपादक व रिव्युव्हर म्हणून काम पाहतात. त्यांनी जवळपास ८ हुन अधिक मेजर प्रोजेक्ट्स पूर्ण केले आहेत व यासाठी जवळपास दीड कोठीहुन अधिक निधी त्यांना प्राप्त झाला आहे. यामाध्यमातून त्यांनी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप देऊन शिकविले आहे. एकंदरीतच त्यांनी शैक्षणिक, सामाजिक व संशोधन क्षेत्रात केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!