शिवाजीचा दिलबहारवर निसटता विजय

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या सामन्यात शिवाजी तरूण मंडळने दिलबहार तालीम मंडळवर १-०ने निसटता विजय मिळवला. या विजयामुळे शिवाजीच्या गुणतक्त्यात तीन गुणांची नोंद झाली. शुभम साळोखेने हा एकमेव गोल केला. उत्कृष्ट खेळाडूचा बहूमान शिवाजीच्या संकेत साळोखे यास मिळाला. केएसएचे अध्यक्ष श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन संकेतला गौरविण्यात आले.
        शिवाजी पेठेतील झुंजार क्लब आणि फॉर्म्युला थ्री रेसर कृष्णराज महाडिक यांच्यावतीने आयोजित के.एम. चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. या स्पर्धेत शुक्रवारपासून सुपरलिगच्या सामन्यांना प्रारंभ झाला. शिवाजी – दिलबहार हा सामना चुरशीचा झाला. पूर्वार्धात २२व्या मिनिटास झालेल्या चढाईत शुभम साळोखेने गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. गोलची परतफेड करण्यासाठी दिलबहारच्या सनी सणगर, रोहन दाभोळकर, जावेद जमादार, महंमद खुर्शीद, सतेज साळोखे यांनी खोलवर चढाया केल्या पण यश आले नाही. शेवटपर्यंत गोलची नोंद करून बरोबरी साधण्याचा प्रयत्न दिलबहारच्या खेळाडूंनी केला परंतु ते अयशस्वी ठरले. शिवाजीकडून गोलची आघाडी वाढवण्यासाठी करण चव्हाण, शुभम साळोखे, सुयश हांडे, संकेत साळोखे, योगेश कदम यांनी वेगवान चाली रचल्या पण समन्वयाअभावी तसेच दिशाहीन फटके मारल्याने त्या वाया गेल्या. अखेर पूर्वार्धात नोंदवलेल्या एकमेव गोलच्या जोरावर शिवाजीने विजयावर शिक्कामोर्तब करून तीन गुणांची कमाई केली.
       प्रफुल्ल पटेल केएसएला भेट देणार…..
       ऑल इंडिया फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे शनिवारी (दि.२३) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. छत्रपती शाहू स्टेडियम येथील कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन (केएसए) कार्यालयास सदिच्छा भेट देणार आहेत. तसेच फुटबॉल सामन्यास उपस्थित राहणार असल्याचे केएसएचे अध्यक्ष श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांनी सांगितले.   
       सुपरलिगचे सामने दुपारी ४ वाजता…..
दि.२३: फुलेवाडी – बालगोपाल
दि.२४: शिवाजी – बालगोपाल
दि.२५: फुलेवाडी – दिलबहार
दि.२६: शिवाजी – फुलेवाडी
दि.२७: बालगोपाल – दिलबहार

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!