कोल्हापूर • (जिल्हा माहिती कार्यालय)
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन म्हणजेच ६ जून, यंदाच्या वर्षापासून “शिवस्वराज्य दिन” साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने रविवारी (दि.६) जिल्हा परिषदेच्या प्रांगणात सकाळी ९ वाजता पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते ‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ उभारली जाणार आहे.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या प्रांगणात देखील ‘ शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ उभारली जाणार आहे. यावेळी शिवराज्यभिषेक सोहळा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे, मर्दानी खेळ प्रात्यक्षिक, पोवाडा तसेच शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या चित्रकर्त्या डॉ. अल्पना चौगुले यांचा सत्कार तसेच कोविडयोध्दा कै. सुरेश निंबा देशमुख, परिचर यांच्या वारसांना शासनाने मंजूर केलेल्या ५० लाख रुपयांचा धनादेश वितरण करण्यात येणार आहे .
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदचे अध्यक्ष बजरंग पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, संजयसिंह चव्हाण, उपाध्यक्ष सतिश पाटील, बांधकाम व आरोग्य समिती सभापती हंबीरराव पाटील, शिक्षण व अर्थ समिती सभापती प्रवीण यादव, महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्यमाराणी पाटील, समाजकल्याण समिती सभापती श्रीमती स्वाती सासणे यांच्यासह जि.प. सदस्य तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनिषा देसाई आदी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील संबंधित ग्रामपंचायती, पंचायत समित्यामध्ये लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे. संपूर्ण कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करुन होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात आली.