• उपआयुक्त शिल्पा दरेकर यांच्याकडून कार्यालयांची तपासणी
कोल्हापूर • प्रतिनिधी
उपआयुक्त शिल्पा दरेकर यांनी छत्रपती शिवाजी मार्केटमधील महापालिकेच्या विविध कार्यालयांची बुधवारी सकाळी दहा वाजता तपासणी करून सर्व कार्यालयातील हजेरी मस्टर जप्त केली. कार्यालयात वेळेवर उपस्थित नसलेल्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
या तपासणीवेळी परवाना विभाग, इस्टेट विभाग, विभागीय कार्यालय क्र. २, एल.बी.टी. विभाग, पेन्शन व फंड विभाग, घरफाळा विभागाकडील ५५ कर्मचारी कार्यालयांमध्ये विहित वेळेत उपस्थित नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच विवाह नोंदणी विभाग व विधी विभागाचे कार्यालयाचे दरवाजा विहित वेळेत उघडला नसल्याचे निदर्शनास आले. विवाह नोंदणी कार्यालयाच्या गेटचे बाहेर काही नागरिक हे कर्मचाऱ्यांची वाट पहात उभे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे या दोन्ही विभागाकडील १० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
महापालिकेच्या विविध विभागांकडील अनेक कर्मचारी हे विलंबाने कामावर येत असल्याबाबत व कार्यालयीन वेळ संपण्यापूर्वी घरी निघून जात असल्याबाबतच्या तक्रारी उप आयुक्त शिल्पा दरेकर यांच्याकडे येत होत्या. त्यानुसार बुधवारी सकाळी दहा वाजता उपआयुक्त शिल्पा दरेकर यांनी छत्रपती शिवाजी मार्केटमधील विविध कार्यालयांची तपासणी करुन हजेरी मस्टर ताब्यात घेतले. या सर्व विभागांकडील ६५ कर्मचारी हे कार्यालयात वेळेत उपस्थित नसल्याबाबत त्यांच्या निदर्शनास आले. यापैकी ५५ कर्मचाऱ्यांना अंतिम समज देण्यात आली तर विधी विभाग व विवाह नोंदणी कार्यालयाकडील १० कर्मचाऱ्यांना कार्यालयच उघडले नसल्याने कारणे दाखवा नोटीसा बजाविण्यात आलेली आहे.