श्री अंबाबाईची ‘ महाशक्ती कुण्डलिनीस्वरुपा ‘ रूपात पूजा


कोल्हापूर • प्रतिनिधी
    अश्र्विन शुद्ध प्रतिपदेला करवीरनिवासिनी श्री अंबाबाई – महालक्ष्मीची ‘ महाशक्ती कुण्डलिनीस्वरुपा ‘ रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. यंदाच्या नवरात्रौत्सवात करवीरनिवासिनीचे करवीर महात्म्यातील निवडक स्तोत्रांमधून होणारे दर्शन ही संकल्पना राबवली आहे.
    साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शनिवारी शारदीय नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला. सकाळी साडेआठ वाजता तोफेच्या सलामीने घटस्थापना व धार्मिक विधी झाले. त्यानंतर दुपारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई – महालक्ष्मी देवीची सालंकृत पूजा बांधण्यात आली. प्रतिपदेला देवीची ‘ महाशक्ती कुण्डलिनीस्वरुपा ‘ रूपात पूजा बांधण्यात आली. यावर्षी नवरात्रौत्सवामध्ये देवीचे करवीर महात्म्यातील निवडक स्तोत्रांमधून होणारे दर्शन ही संकल्पना पूजेसाठी मांडली आहे.
     दरम्यान, दरवर्षी नवरात्रौत्सवात  आकर्षक पध्दतीने बांधण्यात येत असलेल्या विविध रूपातील सालंकृत पूजा पाहण्यासाठी व देवीचे मनोभावे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक अंबाबाई मंदिरात येतात.यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्यामुळे मंदीर परिसर सुना सुना भासत आहे. जे काही स्थानिक भाविक येतात तेही लांबूनच मंदिराच्या कळसाला नमस्कार करून जातात.
    अश्र्विन शुद्ध प्रतिपदेला करवीरनिवासिनी श्री अंबाबाई महाशक्ती कुण्डलिनीस्वरुपात स्थानापन्न झालेली आहे.कुण्डलिनी हीच आत्मशक्ती. निर्माण, पालन आणि संहाराची शक्ती. ही कुण्डलिनीच प्राणशक्ती,आधारशक्ती आणि त्यामुळेच परब्रह्मस्वरूपा .अशा आशयाची ही पूजा श्रीपूजक माधव मुनिश्वर व मकरंद मुनिश्वर यांनी बांधली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *