रेंदाळच्या श्रीराज भोसलेची जेतेपदाची हॅट्ट्रिक

Spread the love

•डेरवण येथील बुद्धिबळ स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा अजिंक्य
कोल्हापूर • प्रतिनिधी
    डेरवण (ता. चिपळूण जि.रत्नागिरी) येथील श्री. विठ्ठलराव जोशी चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने डेरवण यूथ गेम्स (१८ वर्षाखालील मुलांसाठी) मधील बुद्धिबळ स्पर्धेत रेंदाळ येथील श्रीराज भोसलेने अपेक्षेप्रमाणे यश मिळवून  सलग तिसऱ्यांदा स्पर्धा जिंकत जेतेपदाची हॅट्ट्रिक साधली. रोख  साडेपाच हजार रुपये व चषक देऊन त्याला गौरविण्यात आले.
    श्रीराजने या स्पर्धेत सातपैकी सहा गुण केले. सातारच्या हर्षल पाटीलने साडेपाच गुणांसह दुसरे स्थान मिळविले तर रायगडच्या श्रावणी पाटीलने पाच गुणांसह तृतीय स्थान पटकाविले.
     गतविजेत्या श्रीराजने सुरवातीपासून  आक्रमक खेळ करत पहिल्या तीन फेरीत अनुक्रमे दक्षिल कजरोलकर (सातारा), ओंकार सावर्डेकर (चिपळूण) व ओंकार पाटील (पुणे)  यांचा पराभव करत आघाडी घेतली. चौथ्या फेरीत मात्र पुण्याच्या हर्षल पाटीलने श्रीराजला बरोबरीत रोखले. पाचव्या फेरीत श्रीराजने मुंबईच्या ओम कदमला नमवून पुन्हा आघाडी घेतली. नंतरच्या सहाव्या फेरीत सावंतवाडीच्या बाळकृष्ण पेडणेकरला पराभूत करून श्रीराजने निर्णायक मजबूत आघाडी घेतली व शेवटच्या अंतिम फेरीत इचलकरंजीच्या कौस्तुभ गोते विरुद्ध कोणताही धोका न पत्करता बरोबरी साधत अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केला.
      तीन वर्षांपूर्वी डेरवण येथे झालेल्या राज्यस्तरीय शासकीय शालेय स्पर्धेत श्रीराज भोसलेने चांगली कामगिरी करत राज्य संघात स्थान पटकावले होते. त्यानंतर झालेल्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत महाराष्ट्राला रौप्यपदक मिळवून देण्यात मोठी कामगिरी केली होती. जनता ज्युनियर कॉलेज, हुपरी येथे १२वीमध्ये शिकत असलेल्या श्रीराजला त्याचे वडील सूर्याजी भोसले यांचेकडून पहिल्यापासून बुद्धिबळ प्रशिक्षण मिळाले आहे. त्याचबरोबर जनता शिक्षण समुहाचे चेअरमन आण्णासाहेब शेंडूरे, ज्यु. कॉलेजचे प्राचार्य डी. ए. पाटील, कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विश्वविजय खानविलकर, सचिव भरत चौगुले यांचे विशेष मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
———————————————– 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!