कोल्हापूर • प्रतिनिधी
लक्ष्मीपुरी येथे मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड ॲन्टीजन टेस्टवेळी ६ भाजी विक्रेत्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
शहरामध्ये संचारबंदी आहे, परंतु अत्यावश्यक कामाच्या नावाखाली नागरीक गर्दी करत आहेत. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्याच्या सुचना प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिल्या होत्या. त्याप्रमाणे रविवारी लक्ष्मीपुरी भाजी मार्केट येथील नागरीक, व्यापारी, भाजी विक्रेते व फळ विक्रेते यांची मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये एकूण १२५ नागरीक, व्यापारी, भाजी विक्रेते, फळ विक्रेते यांची टेस्ट करण्यात आली. यामध्ये ११९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ग्रामीण भागातून भाजी विक्रेसाठी आलेले ६ विक्रेत्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
प्रामुख्याने शहरामध्ये पॉझिटिव्ह रुग्ण कमी प्रमाणात असून बाहेर गावाहून येणाऱ्या नागरीक, व्यापारी, विक्रेते यांच्यामुळे संक्रमणाचा धोका शहरात वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी भाजी, फळे खरेदी करताना गर्दी ठिकाणी न जाता याठिकाणी खरेदी करताना मास्कचा वापर व सॅनिटाईजरचा वापर करणे आवश्यक आहे. अन्यथा अशा गर्दीच्या ठिकाणी हॉटस्पॉट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी टाळावी व गर्दीत जाणे टाळावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.