सामाजिक चिकित्सालयाची समाजास नितांत आवश्यकता: कुलगुरू डॉ. शिर्के

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     समाजशास्त्र विभागाने सामाजिक चिकीत्सालयाची एक आगळी वेगळी संकल्पनासमाजासमोर आणली आहे, ज्याची समाजाला नितांत आवश्यकता आहे, असे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. डी.टी. शिर्के यांनी व्यक्त केले. समाजशास्त्र अधिविभागाच्या सामाजिक चिकित्सालयाच्या उद्दघाटनप्रसंगी ते बोलत होते.
     कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, समाजशास्त्र विभागाच्यावतीने समाज विकासात भर घालण्यासाठी आणि विशेषतः वैद्यकीय क्षेत्रात अॅलोपॅथिक, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि योग या चार स्तरांवर समाजातील व्यक्तीच्या शारीरिक व्याधी कमी करण्यासाठी कार्यरत आहेत. असे असले तरी विविध व्यक्तीगत आणि कौटुंबिक प्रश्नांमुळे अनेक मानवनिर्मित व्याधी निर्माण होतात. सामाजिक नाते संबंध अतिशय संवेदनशील असतात. त्यातील गुंता हळूवारपणे सोडवण्यासाठी हे चिकित्सालय उपयुक्त ठरेल. अशावेळी समाजमन ओळखून त्यावर बऱ्याच प्रमाणात वैद्यकीय गोळ्या, औषधे न घेताही काही आजार बरे होऊ शकतात. हे चिकित्सालय तरुणांसाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते. समाजालाच आज अशा चिकीत्सालयाची आवश्यकता आहे. सदर कार्य समाजशास्त्र अधिविभागाने उत्तम पद्धतीने चालवावे, असे त्यांनी सांगितले. 
     यावेळी प्र-कुलगुरु डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, व्याधीग्रस्त व्यक्तींची वर्गवारी करुन त्यानुसार ते प्रश्न सोडविण्यासाठी समुपदेशनाची आवश्यकता आहे. अशा प्रकारच्या सामाजिक चिकित्सालयाची संकल्पना केवळ विद्यापीठातच नव्हे, तर देशातीलही कदाचित अशा स्वरुपाचा पहिलाच अभिनव उपक्रम असावा, असे मत व्यक्त केले.
     कुलगुरु डॉ. शिर्के व प्र-कुलगुरु डॉ. पाटील यांच्या हस्ते सामाजिक चिकित्सालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी समाजशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. जगन कराडे यांनी सामाजिक चिकित्सालयाची संकल्पना आणि त्याची आवश्यकता व व्याप्ती विषद केली. डॉ. पी. एम.माने यांनी आभार मानले. समारंभास वाणिज्यmm व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. महाजन, डॉ. व्ही. एस. मारुलकर, डॉ. प्रतिमा पवार, डॉ पी.बी.देसाई, डॉ. संजय कांबळे, कोमल ओसवाल, अभिजित पाटील आणि विभागातील संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!