कोल्हापूर • प्रतिनिधी
बिग डेटा, नोटिफिकेशन आणि अल्गोरिदमच्या साहाय्याने सोशल मीडिया मानवी जगण्यात हस्तक्षेप करत आहे. ट्रेंड आणि सजेशनवर तयार होणारी मते धोकादायक आहेत. सोशल मीडियाच्या प्रभावाखाली माणसांची स्वतंत्र विचार करण्याची क्षमता हरवली आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जनसंज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रा. योगेश बोराटे यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाचे पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन आणि तिटवे (ता. राधानगरी) येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “सोशल मीडियाची आजादी: किती खरी, किती खोटी?” या विषयावरील ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. ‘आजादी का अमृत महोत्सव’ उपक्रमांतर्गत व्याख्यान आयोजित करण्यात आले.
प्रा. बोराटे म्हणाले, सोशल मीडिया हाताळताना भारतीय राज्यघटनेतील समता, न्याय आणि बंधुता या तत्त्वांचा विसर पडता कामा नये. सोशल मीडियातून रंजक जगाचा आभास तयार केला जातो. त्यामुळे लोक या मीडियात गुंतून राहतात. यामध्ये ते आपला अमूल्य वेळ वाया घालवितात. लोकांच्या वेळेच्या गुंतवणुकीवरच सोशल मीडियाचे अर्थकारण अवलंबून आहे. एका अर्थाने सोशल मीडिया भावनांची ऑनलाईन बाजारपेठ आहे. अल्गोरिदमद्वारे कृती करायला लोकांना भाग पाडले जाते. नकळतपणे लोक व्यक्त होत राहतात. ही अभिव्यक्ती आहे का, याचा विचार करावा लागेल.
ते म्हणाले, ट्रेंड किंवा सजेशनवर लोकांची मते तयार होतात. यातून स्वतंत्र विचार करण्याची क्षमता लोप पावत आहे. निवडीचे स्वातंत्र्य उरत नसल्याने आपण आपली अभिव्यक्तीच मांडतो की कोणी तरी आपल्याकडून तसे वदवून घेत आहे, याचा विचारही सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांनी केला पाहिजे. नोटिफिकेशनसारख्या स्वयंचलित यंत्रणा तांत्रिक सोयी मिळवण्यापुरत्या ठीक आहेत. परंतु त्यापलीकडे त्याचा विचार केल्यास ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील आक्रमण ठरेल.
आकड्यांचा खेळ आणि भावनांचा बाजार…..
सोशल मीडिया हा आकड्यांचा खेळ आहे. लाईक, शेअर आणि फॉलोअर यावर लोकांची प्रतिष्ठा आणि मोठेपणा ठरू पाहत आहे. खरे तर हा मीडिया भावनांचा बाजार करतो. आपल्या भावना अन्य कोणीतरी नियंत्रित करते. त्यामुळे आपल्याला सोशल मीडियाच्या अविचारापासून आजादी मिळवली पाहिजे, असे मतही प्रा. बोराटे यांनी व्यक्त केले.
प्रारंभी अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी स्वागत केले. बी. ए. पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा. दिग्विजय कुंभार यांनी आभार मानले.