देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महिलांचे सामाजिक-आर्थिक समावेशन अत्यावश्यक: आर. मुकुंदन

Spread the love

कोल्हापूर • प्रतिनिधी
     देशाच्या सर्वांगीण सामाजिक-आर्थिक प्रगतीसाठी ५० टक्के लोकसंख्या असलेल्या महिलावर्गाला सर्वच क्षेत्रांतील मुख्य प्रवाहात बरोबरीने सामावून घेण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन टाटा केमिकल्स लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आर. मुकुंदन यांनी आज येथे केले.
     शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाच्या वतीने सुरू असलेल्या विशेष ऑनलाईन व्याख्यानमालेअंतर्गत अंतिम चौथे पुष्प गुंफताना ते बोलत होते. ‘भारतातील संवर्धनीय शाश्वतता व डिजीटल संधींचे नवनिर्माण’ (इनोव्हेटिंग लिव्हरेजिंग सस्टेनेबिलिटी अँड डिजीटल ऑपॉर्च्युनिटीज् इन इंडिया) या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. यशवंतराव थोरात प्रमुख उपस्थित होते.
    श्री. मुकुंदन म्हणाले, भारतातील सध्याची तरुण पिढी भाग्यशाली आहे कारण येत्या २० वर्षांत भारताच्या सर्वांगीण वृद्धीमध्ये सक्रिय योगदान देण्याची संधी त्यांना लाभणार आहे. येत्या दहा वर्षांतच आपल्या देशाच्या अर्थकारणाचा आवाका दुपटीने वाढणार आहे. भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरच्या घरात असेल. ही वृद्धी केवळ संख्यात्मक नसेल, तर दर्जात्मकही असेल. मात्र, त्यासाठी आपल्या शालेय शिक्षण, उच्चशिक्षणापासून ते सर्वंच क्षेत्रांत महिलांना बरोबरीचा दर्जा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. शिक्षणाच्या प्रवाहात पुरूषांच्या तुलनेत महिलांची वाढती संख्या निश्चितच उत्साहवर्धक असली तरी लिंगभेदविरहित समताधिष्ठित समाजव्यवस्थेमध्ये तिचे सामाजिक-आर्थिक समावेशन कशा पद्धतीने होते, यावर पुढील वाटचाल अवलंबून असेल.
     संवर्धनशील, शाश्वत विकास आणि डिजीटल तंत्रज्ञान या दोन बाबीं सर्वच क्षेत्रांच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या असल्याचे सांगून श्री. मुकुंदन पुढे म्हणाले, विकासाच्या प्रक्रियेमध्ये नैसर्गिक संसाधनांचा वापर जास्तीत जास्त विचारपूर्वक आणि सांभाळून करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे त्यांची कमीत कमी हानी करणे आणि झालेली हानी भरून काढणे, ही जबाबदारी पार पाडण्यासाठी विकसकांनी तत्पर असायला हवे. संवर्धनशील फिरती अर्थव्यवस्था अंगिकारली पाहिजे. अर्थात उत्पादनाचा वापर झाल्यानंतर त्यावर पुनर्प्रक्रिया करून ते पुन्हा उत्पादन प्रक्रियेशी जोडले जाणे आवश्यक आहे. या बाबींबरोबरच जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन या बाबींकडे काणाडोळा न करता त्यांची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे. एकूणातच समावेशक वृद्धीला कोणत्याही परिस्थितीत पर्याय नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.  
     अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, संवर्धनशील विकासाच्या साध्यतेसाठी महत्त्वाच्या अशा सर्वच बाबींचा मुकुंदन यांनी त्यांच्या व्याख्यानात उत्तम रितीने वेध घेतला. लिंगसमानता, समतोल  सामाजिक-आर्थिक विकास, संवर्धनशीलता, नैसर्गिक संसाधनाचा पुनर्वापर, जैवविविधतेचे संरक्षण अशा सर्वंकष बाबींचा शैक्षणिक प्रक्रियेमध्ये सुरवातीपासून समावेश करून सजग व जाणीवासमृद्ध भावी पिढी घडविण्याची आज मोठी गरज आहे. या संपूर्ण व्याख्यानमालेसाठी डॉ. यशवंतराव थोरात यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनाही कुलगुरूंनी धन्यवाद दिले.
     यावेळी अर्थशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. ज्ञानदेव तळुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ. यशवंतराव थोरात यांनी प्रमुख व्याख्यात्यांचा परिचय करून दिला.
——————————————————- ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!