पालकमंत्री सतेज पाटील यांचे हस्ते सौर कृषी पंप मंजुरी आदेशाचे वितरण

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      प्रजासत्ताक दिनी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांचे हस्ते मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सौर कृषी पंपाच्या मंजुरी आदेशाचे वितरण जिल्ह्यातील चार लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात करण्यात आले.
     शाश्वत व स्वच्छ इंधनाचा स्त्रोत असलेल्या सौर ऊर्जेच्या माध्यमातून  शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या हेतूने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबविण्यात येते आहे. या योजनेनुसार पात्र लाभार्थ्यांना प्रवर्गानुसार ५ ते १० टक्के  पंपाच्या मूळ किंमतीच्या रक्कमेचा भरणा केल्यानंतर अनुदान तत्वावर सौर कृषी पंपाचे वितरण करण्यात येत आहे. या योजनेनुसार अपारंपारिक वीज जोडणी उपलब्ध नसलेल्या अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले गेले आहे.
     प्रजासत्ताक दिनाचे औचित्याने पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते  किरण  लाडगावकर (मौजे कोडोली ता.पन्हाळा), मानसिंग सुर्वे (मौजे नरंदे ता.हातकणंगले), अण्णाप्पा केष्ते (मौजे कवठे गुलंद ता.शिरोळ) व  कृष्णात कदम (मौजे जांभळी ता.शिरोळ) या चार लाभार्थी शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाच्या मंजुरी आदेशाचे वितरण करण्यात आले.
      यावेळी अधिक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सौर कृषी पंप योजना व कृषी पंप वीज जोडणी संदर्भातील माहिती दिली. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत ६६८ शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेतल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कार्यकारी अभियंता सुनिल शिंदे हे उपस्थित होते. प्रास्ताविक उपकार्यकारी अभियंता मंदार बोरगे तर आभारप्रदर्शन मुकुंद आंबी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!