कोल्हापूर • प्रतिनिधी
मागील चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने थैमान घातले आहे. या महापुराचा फटका महावितरणच्या यंत्रणेलाही बसला आहे. महावितरणकडून वीजपुरवठा पुर्ववत करण्यासाठी अहोरात्र शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अद्यापपर्यंत ३ लक्ष २५ हजार बाधित ग्राहकांपैकी २ लक्ष ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले आहे. आणखीन दोन दिवसात शहरातील वीजुपरवठा पुर्ववत होऊ शकतो. परंतु ग्रामीण व अतिदुर्गम भागातील वीजपुरवठा पुर्वपदावर येण्यास वेळ लागू शकतो. ही गोष्ट लक्षात घेऊन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सामाजिक जाणिवेपोटी अतिदुर्गम भागातील पुरबाधित वाडी/ वस्त्यांवरील नागरिकांसाठी ५०० सौरदिवे तातडीने पाठविले आहेत.
कोल्हापूर व सांगलीच्या पुरस्थितीवर ऊर्जामंत्री नितीन राऊत हे बारिक लक्ष ठेवून आहेत. ते सकाळ संध्याकाळ स्थितीचा आढावा घेत आहेत. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युध्दपातळीवर काम करण्याच्या सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत.
जिल्ह्यातील नदीकाठच्या व डोंगराळ भागातील गावात मोठ्या प्रमाणत पाणी आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळणे , भूस्सखलन अशा घटना घडल्याने वीजखांब जमिनदोस्त झाले आहेत. वीज वाहिन्या तुटलेल्या आहेत. तिथे पोहचून वीज पुरवठा सुरळीत करणे जिकीरीचे आहे. पूर ओसरल्यांनतरच ते काम करता येणे शक्य आहे. त्यामुळे महापूराच्या सामना करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगराळ, दुर्गम भागातील व पुरामुळे वीजपुरवठा लवकर सुरळीत करणे शक्य होणार नसलेल्या गावे वाड्या/ पाड्यांतील नागरिकांसाठी महावितरणकडून सौरदिव्यांचे वितरीत करण्यात येणार आहेत. आपातकालीन परिस्थितीत दुर्गम भागातील नागरिकांची गैरसोय दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे. या सौरदिव्यात टॉर्च, मोबाईल चार्जिंगची सुविधा आहे. साप, विंचू व वन्यप्राण्यांपासूनचा धोका सौरदिव्यांच्या प्रकाशामुळे कमी होणार आहे. कोल्हापूरात हे सौरदिवे वितरीत करण्यास सुरूवात केली आहे.
महावितरणकडून शिरोळ तालुक्यातील शिरटी येथील पुरबाधित आजीबाई श्रीमती फुलाबाई सदामते यांना सौरदिवा वितरीत करण्यात आला. महावितरणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निकड असलेल्या वस्त्यांवर हे सौर दिवे पोहचविले जाणार आहेत. आपत्तीचा सामना करणाऱ्या कोल्हापूरवासीयांसाठी प्रकाशाची सुविधा देणारे हे सौरदिवे मोलाचे आहेत.