कोल्हापूर • प्रतिनिधी
वीज ग्राहक व वीज कर्मचारी यांच्यात एक विश्वासाचे नाते असणे गरजेचे आहे. महावितरणचे कोगे शाखा कार्यालय हे नाते निर्माण करण्यात सफल झाल्याचे दिसून येते. ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करणे, वीज ग्राहकांच्या तक्रारी ऐकून त्यांचे तत्काळ निरसन करणे कर्मचाऱ्यांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांनी केले. करवीर तालुक्यातील बहिरेश्वर येथे आयोजित ‘एक गाव -एक दिवस’ या कार्यक्रमप्रसंगी श्री.निर्मळे बोलत होते.
महावितरणच्या फुलेवाडी उपविभाग कार्यालय अंतर्गत कोगे शाखा कार्यालयाच्यावतीने ‘एक गाव -एक दिवस’ हा उपक्रम बहिरेश्वर येथे राबविण्यात आला. यावेळी अधीक्षक अभियंता अंकुर कावळे, कार्यकारी अभियंता (प्रशासन) नरेंद्र ताडे, कार्यकारी अभियंता दीपक पाटील, उपविभागीय अभियंता संतोष मरळी , बहिरेश्वरचे सरपंच युवराज दिंडे, कोगेच्या सरपंच सौ.नीलम पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते. ग्रामपंचायत बहिरेश्वर व कोटेश्वर विकास सेवा संस्थेच्यावतीने अतिथींचा सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना श्री. निर्मळे यांनी बहिरेश्वर गावचे कृषीपंपाची ८० टक्के भरल्याबद्दल विशेष कौतुक केले. या भागात पाच एकर जमीन उपलब्ध करून दिल्यास शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासाठी सौर वीज प्रकल्प उभारण्याचे आश्वासन दिले. कृषीपंपाचे वीज बिल भरलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष मरळी तर सूत्रसंचालन कोगे शाखा अभियंता आर. एस. कांबळे यांनी केले