सौंदती यात्रेवरील खोळंबा आकार पूर्ण रद्द करा : राजेश क्षीरसागर

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     सौंदत्ती यात्रेवरील खोळंबा आकार पूर्ण रद्द करावा, यासह विविध करांमध्ये कायमस्वरूपी विशेष सवलत मिळावी अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली.
     लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदती डोंगर, कर्नाटक येथील श्री रेणुका देवीची यात्रा प्रतिवर्षी प्रमाणे येत्या डिसेंबर महिन्यात आहे. या यात्रेकरिता कोल्हापूर व आसपासच्या परिसरातून लाखो भाविक जात असतात. यात्रेकरिता गेली २५ ते ३० वर्षे रेणुका भक्त एस.टी. ने जात आहेत. अलीकडच्या काळामध्ये वाहतुकीच्या नवनवीन सुविधा उपलब्ध असतानादेखील यात्रेकरिता एस.टी.ला पसंती दिली जाते. सौंदती यात्रेकरिता शहरातून जवळपास २०० एस. टी. गाड्या प्रासंगिक कराराद्वारे बुकिंग केल्या जातात. या गाड्यांच्या खोळंबा आकारामध्ये गेल्या अनेक वर्षापासून भाविकांमध्ये गैरसमज पसरविण्याचे काम काहींकडून होत होते. परंतु, रेणुका भक्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीनंतर आपण यामध्ये लक्ष घातले असून, तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे गेल्या चार वर्षात बसेसवरील खोळंबा आकार आणि गाडीभाडे यामध्ये भरघोस सवलत देण्यात आली आहे.    
    यंदा कोरोनाचे संकट पाहता यात्रेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह आहे. परंतु यात्रा होणार असल्याचे निश्चित झाल्यास, सौंदती यात्रेवरील खोळंबा आकार पूर्ण रद्द करावा, यासह गेल्या चार वर्षात देण्यात आलेल्या सवलतीप्रमाणे विविध करांमध्ये कायमस्वरूपी विशेष सवलत द्यावी, अशी मागणी आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!