• स्पेन – इटली आणि डेन्मार्क – इंग्लंड उपांत्य सामना
कोल्हापूर • प्रतिनिधी
युरोपियन देशात सुरू असलेल्या युरो कप फुटबॉल स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामने चुरशीने खेळले गेले. यामध्ये स्पेन, इटली, डेन्मार्क व इंग्लंडने आपापल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करून उपांत्य फेरीत धडक मारली आहे. दि. ७ रोजी स्पेन विरूद्ध इटली आणि दि.८ रोजी डेन्मार्क विरूद्ध इंग्लंड असे उपांत्य फेरीचे सामने होतील. यातील विजयी संघ १२ जुलै रोजी जेतेपदासाठी आमने-सामने येतील. हे सर्व सामने लंडन येथील वेम्बली स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री १२:३० वाजता होतील.
फिफा वर्ल्ड कपनंतर फुटबॉलप्रेमींची सर्वाधिक पसंती असलेल्या युरो कप फुटबॉल स्पर्धेला १२ जूनपासून सुरूवात झाली. आता स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. २४ संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरी व बाद फेरीतील सामन्यांनंतर उपांत्यपूर्व फेरीचे सामने होऊन चार संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे.
उपांत्यपूर्व फेरीत झालेल्या लढतीत स्पेनने स्वित्झर्लंडवर मात केली. पूर्णवेळेत १-१ गोल बरोबरीत राहिलेल्या सामन्यात स्पेनने स्वित्झर्लंडवर पेनल्टी शूटआऊटवर ३-१ ने मात केली. इटलीने बेल्जियमचे आव्हान २-१ गोलने संपुष्टात आणले. तसेच डेन्मार्कने झेक प्रजासत्ताकवर २-१ असा तर इंग्लंडने युक्रेनवर ४-० गोलने विजय मिळवून उपांत्य फेरीत धडक मारली. आता उपांत्य फेरीत स्पेन विरूद्ध इटली आणि डेन्मार्क विरूद्ध इंग्लंड असे सामने होतील. या सामन्यांचा थरार फुटबॉलप्रेमींना पहायला मिळणार आहे. उपांत्य फेरीतील विजयी संघात विजेतेपदासाठी लढत होईल.
उपांत्य फेरी सामना
• दि.७: स्पेन विरुद्ध इटली – मध्यरात्री १२:३० वाजता.
• दि.८: डेन्मार्क विरूद्ध इंग्लंड – मध्यरात्री १२:३० वाजता.
अंतिम सामना
• दि.१२ जुलै मध्यरात्री १२:३० वाजता .
उपांत्य फेरीच्या सामन्यातील विजयी संघात अंतिम सामना होईल.