कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर महानगरपालिका परिवहन (के.एम.टी.) उपक्रमामार्फत महाविद्यालयीन विद्यार्थीनी, नोकरदार व नियमित प्रवास करणाऱ्या महिलांकरितां “विशेष बस सेवा” सुरु करण्यासाठी गुगल फॉर्मद्वारे प्रवाशांकडून सर्व्हेक्षण करण्यात आले होते. या सर्व्हेक्षणास मिळालेल्या प्रतिसादानुसार श्री शाहू मैदान ते आर.के.नगर – जिल्हा परिषदमार्गे शुगरमिल या मार्गावर फक्त महिला प्रवाशांकरितां “विशेष बस सेवा” सुरु करण्यात येत आहे.
सदरची बस शालेय, महाविद्यालयीन महिला विद्यार्थीनी, महिला कर्मचारी तसेच अन्य महिला वर्गासाठी श्री शाहू मैदान येथून आर.के.नगर – जिल्हा परिषदमार्गे शुगरमिल व परत शुगरमिल येथून मार्गस्थ होऊन जिल्हा परिषद – आर.के.नगरमार्गे श्री शाहू मैदानपर्यन्त धावेल. या बसमध्ये महिला वाहक (कंडक्टर) कार्यरत असणार आहे. या बसमधून महिला प्रवाशांसोबत असणाऱ्या ३ ते १२ वयापर्यन्तच्या लहान मुलांना प्रवास करता येईल.
या विशेष बस सेवेचा शुभारंभ कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांचु हस्ते व प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि.१) सकाळी आठ वाजता छत्रपती शाहू स्टेडियम येथून करण्यात येणार आहे. या विशेष बस सेवचा लाभ अधिकाधिक महिला प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन परिवहन उपक्रमातर्फे करण्यात आले आहे.
——————————————————-