दहावी-बारावीचे वर्ग नियमित सुरू करा ; विद्यार्थिनींचे शिक्षण उपसंचालकांना निवेदन


कोल्हापूर • प्रतिनिधी
      चालू शैक्षणिक वर्ष सन २०२१-२२ मधील दहावी-बारावीचे वर्ग ऑफलाईन पध्दतीने नियमित सुरू करण्यात यावेत, अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्यावतीने विद्यार्थीनींनी केली. विद्यार्थीनींनी मागणीचे निवेदन कोल्हापूर विभाग शिक्षण उपसंचालक श्री. सोनवणे यांना दिले.
      दरम्यान, शासन स्तरावर प्रस्ताव पाठवून देऊन लवकरात लवकर मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी शिक्षण उपसंचालक यांनी शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात श्रृती उत्तम जाधव, साक्षी रविंद्र जाधव, धिरीजा रमेश मोरे, ऐश्वर्या डोंगरसाने, विभावरी सुतार, अजित सासने, भाऊ घोडके, अंजुम देसाई, लहुजी शिंदे, प्रमोद पुंगावकर, पंपू सुर्वे, रमेश मोरे, चंद्रकांत पाटील, शिरीष शिंदे, अशोक पोवार आदींचा समावेश होता.
     शिक्षण उपसंचालक यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना काळामध्ये शाळा – कॉलेज बंद असल्याने आमचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे. तरी आम्ही सर्व विद्यार्थी व पालक आपणास विनंती करतो की, कोरोनाचे सर्व नियम पाळून आमचे दहावी आणि बारावीचे ऑफलाईन वर्ग सुरु करावेत. सध्या आमचे ऑनलाईन तास सुरू आहेत. परंतु ऑनलाईन शिकत असताना आम्हाला अनेक अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे बऱ्याच वेळेला शिक्षक शिकवत असताना मोबाईलची रेंज मिळत नाही. त्यामुळे काहीवेळा नीट आवाज ऐकू येत नाही. फळ्यावर लिहिलेलेसुद्धा काहीवेळा अस्पष्ट दिसते. काही शंका असल्यास लगेच विचारता येत नाहीत. शैक्षणिक वातावरण नसल्यामुळे नीट अध्ययन होत नाही. त्याचबरोबर आम्हा सर्वांकडे मोबाईल उपलब्ध होत नाहीत. काही काही पालकांची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्याने ते मोबाईल घेऊ शकत नाहीत. त्याचबरोबर एका घरामध्ये दोन-तीन मुलं एकाचवेळी ऑनलाईन शिकत आहेत. त्या सर्व मुलांना मोबाईल मिळत नाहीत. मोबाईल नेट पॅकचे दर वाढलेले आहेत. काही घरांमध्ये जागा कमी असल्याने ऑनलाईन शिकताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.याचा आपण गांभीर्याने विचार करून कोरोनाचे सर्व नियम पाळून दहावी आणि बारावीचे ऑनलाईन ऐवजी नियमित शाळेत ऑफलाईन तास सुरू करावेत. त्यासाठी विद्यार्थ्यांचे २०-२० किंवा २५-२५ विद्यार्थ्यांच्या बॅचेस पाडून एका बेंचवर एक विद्यार्थी बसून अध्यापन करण्याची आदेश शिक्षण विभागाने सर्व शिक्षण संस्था यांना द्यावीत. जेणेकरून आमचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.
     सन २०२०-२१ च्या परीक्षा रद्द झाल्या. परंतु त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांच्या करिअरवर होणार आहे. तेव्हा सन २०२१-२२ च्या परीक्षा कोणत्याही परिस्थितीत रद्द करू नयेत. त्या ऑफलाईन तसेच ऑनलाईन घेतल्यास आमचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून भारत सरकार तसेच महाराष्ट्र सरकार शिक्षण विभागाने चालू शैक्षणिक वर्षाच्या दहावी-बारावीच्या परीक्षा कोणत्याही कारणास्तव रद्द करण्याची प्रक्रिया न राबवता त्या घेतल्या पाहिजेत अशी आमची आग्रहाची मागणी आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *