शहरात मध्यवर्ती तपासणी केंद्र आणि जम्बो कोव्हीड सेंटरची निर्मिती करा

• राजेश क्षीरसागर यांच्या महापालिका प्रशासनास सूचना
कोल्हापूर • प्रतिनिधी
    महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे. शहरातील वाढती रुग्णसंख्या गंभीर बाब असून, कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने आरोग्य यंत्रणा सक्षम करावी. रुग्णसेवेस गती देण्यासाठी शहरात दसरा चौक येथे मध्यवर्ती तपासणी केंद्र आणि टेंबलाईवाडी येथील आय.आर.बी. कंपनीच्या इमारतीमध्ये जम्बो कोव्हीड सेंटरची निर्मिती करावी, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांना दिल्या. शहरातील वाढता संसर्ग आणि त्यावरील उपाययोजना यासंदर्भात कोल्हापूर महानगरपालिका येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
    बैठकीच्या सुरवातीस राज्य नियोजन राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहरातील कोरोना रुग्णसंख्येची स्थिती, त्यावरील उपाययोजना यांची माहिती घेतली. यानंतर सूचना करताना श्री. क्षीरसागर यांनी, कोल्हापूर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासन कमी पडत असल्याचे चित्र दिसत आहे. शहरात आढळून येणाऱ्या रुग्णांमध्ये १५ वर्ष वयोगट ते ६० वर्षापर्यंतच्या नागरिकांचा समावेश आहे. कोल्हापुरातील कोरोनाची व्याप्ती आणि परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने आपली जबाबदारी ओळखून महापालिका कोव्हीड सेंटर, दवाखाने, क्वारंटाईन सेंटरमधून नागरिकांना चांगल्या सुविधा देणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये कोल्हापूर शहरामध्ये मध्यवर्ती तपासणी केंद्र उभे करावे, अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. आजची परिस्थिती पाहता रोज हजारांच्या संख्येत रुग्णांची वाढ होत आहे. ही परीस्थिती प्रशासनाच्या आवाक्याबाहेर जावू नये यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने जबाबदारी घेवून दसरा चौक येथे स्वतंत्र तपासणी केंद्र उभे करावे. टेंबलाईवाडी येथे आयआरबी कंपनीस दिलेल्या पाच एकर जागेत इमारत उभी असून ती विनावापर आहे. या इमारतीमध्ये कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडून जम्बो कोव्हीड सेंटर उभारल्यास इतर सरकारी रुग्णालयांवरील ताण कमी होवून रुग्णसेवेस गती मिळेल. त्यामुळे जम्बो कोव्हीड सेंटरची उभारणी करण्याची जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाने घ्यावी.
     शहरात अनेक ठिकाणी हॉटस्पॉट घोषित करण्यात आले असून, या ठिकाणात वाढ होत आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघात राबविलेल्या उपाययोजनांची माहिती घेवून वरळी पॅटर्न कोल्हापुरात राबवावा.
शहरातील खासगी हॉस्पिटलवर महानगरपलिका प्रशासनाने नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. ठराविक रुग्णालये बेड उपलब्ध असूनही प्रशासनास चुकीची माहिती देतात, त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही? काही ठराविक हॉस्पिटलमुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा बदनाम होत आहे. या सर्व बाबींकडे गांभीर्याने लक्ष देवून खासगी हॉस्पिटलवर प्रशासनाने नियंत्रण ठेवावे. यासह रेमिडीसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता घ्यावी.
     कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण प्रभावी ठरत असल्याने, त्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. परिणामी, कोल्हापूर शहरात महापालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. यातील बहुतांश नागरिकांना लसीकरणाअभावी परतावे लागत आहे. सध्याची परिस्थिती पाहता दि.१ मे पासून लस घेण्यासाठी प्रचंड गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोशल डीस्टन्सिंगचे पालन होवून शहरातील सर्वच नागरिकांचे लसीकरण होण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने व्यापक मोहीम राबवावी.
     यावेळी आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांनी, शहर नाकाबंदी, घरोघरी तपासणी सुरु असून, त्यातून पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांवर प्राधान्याने उपचार होत आहेत. लसीकरणाच्या ठिकाणी होणारा गोंधळास आळा घालण्यात प्रशासन यशस्वी झाले असून, सध्या ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरिकांना प्राधान्य दिले जात आहे. लसीकरण सुरळीतपणे होण्याकरिता लसींचा साठा वाढवून मिळणे गरजेचे आहे. बाहेरील जिल्ह्यातील रुग्ण कोल्हापुरात दाखल होण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे रुग्णसंख्येचा आकडा वाढत आहे. सुमारे २० टक्के रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. सध्या महानगरपालिकेकडे दहा ठिकाणी ३५६ ऑक्सिजन व तीन ठिकाणी १५ व्हेंन्टीलेटर बेड असून, त्यातील ३१२ बेड रिक्त आहेत. यासह शहरात अजून ४ ठिकाणी कोव्हीड सेंटर उभारण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे. महापालिकेस मनुष्यबळाची कमतरता असून यासाठी पाठपुरावा करावा. लस व ऑक्सिजन साठा वाढवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.  महापालिकेस आवश्यक निधीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला असून, पाठपुरावा करून सदर निधी मिळण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी मागणी आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडे केली.  .
    बैठकीस उपआयुक्त निखील मोरे, उपआयुक्त रविकांत आडसूळे, सहाय्यक आयक्त पंडित घारगे, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, अन्न व औषध प्रशासनाच्या श्रीमती खुपेरकर, डॉ. क्षितीज डोंगरे, युवराज जाबडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *