राज्य हौशी ऑनलाईन निवड बुद्धिबळ स्पर्धा उद्यापासून

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना  शनिवार व रविवारच्या सुट्टयांचे औचित्य साधत हौशी बुद्धिबळ खेळाडूंसाठी (२३०० आंतरराष्ट्रीय गुणांकनाखालील ) राज्यस्तरीय निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन करीत आहे.
     ३१ जुलै व १ ऑगस्ट रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या या राज्यस्तरीय हौशी निवड बुद्धिबळ स्पर्धेत सर्व वयोगटातील बिगर गुणांकित खेळाडू तसेच २३०० आंतरराष्ट्रीय गुणांकनखालील खेळाडू सहभागी होऊ शकतात. २३०० किंवा २३०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त बुद्धिबळपटू व आंतरराष्ट्रीय मास्टर व ग्रँडमास्टर या स्पर्धेत सहभागी होवू शकत नाहीत.
     एकत्रितरित्या स्विस लीग पद्धतीचा अवलंब करीत ही स्पर्धा खेळवली जाणार असून, नऊ फेऱ्या अंती १७००, २००० व २३०० आंतरराष्ट्रीय गुणांकनाखालील कॅटेगरीमध्ये निवडक प्रथम दोन विजेते असे एकूण सहाजण ६ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या राष्ट्रीय हौशी ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राचे अधिकृत प्रतिनिधित्व करतील.
     सदर स्पर्धा जरी एकत्रितरित्या खेळविली जाणार असली तरी प्रत्येक कॅटेगरीमधील प्रथम १५ विजेत्या खेळाडूंना रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. एका खेळाडूस एकाच गटातील एकच जास्त रकमेचे बक्षीस दिले जाईल. या राज्यस्तरीय ऑनलाइन स्पर्धेसाठी संघटनेने तब्बल ६०,००० रकमेची रोख पारितोषिके जाहीर केली आहेत. या व्यतिरिक्त १५,१३,११ व ९  वर्षांखालील वयोगटातील विजेत्या ५ स्पर्धकांना मेडल देऊन गौरविण्यात येणार आहे.
     या दोन दिवसीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने केले जाणार असून टोर्णेलो या बुद्धिबळ संकेतस्थळावर सदर स्पर्धा आयोजित केली जाईल. स्पर्धकांना झूम व टोर्णेलो व्यक्तिगत संगणकावर लॉग इन करून खेळणे अनिवार्य असणार आहे. ३१ जुलै व १ ऑगस्ट या दोन्ही दिवशी दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत स्पर्धेचा कालावधी असेल. सदर फेरीतील एका फेरीसाठी साधारण एक तास तर प्रत्येक खेळाडूस १५ मिनिटे अधिक ५ सेकंद घड्याळी वेळ निश्चित केली गेली आहे.
—————

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!