• मंत्री मुश्रीफ व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सन्मान
कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला महाजीविका अभियानांतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. ग्रामविकास मंत्री व कामगार मंत्री हसन मुश्रीफ राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते बॅंकेच्या संचालिका सौ. स्मिता युवराज गवळी, संचालिका सौ. श्रुतिका शाहू काटकर व महिला कक्ष विभागाच्या अधिकारी श्रीमती रोहिणी विष्णू पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये हा कार्यक्रम झाला.
ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बँकेला हे यश मिळाले. महिलांच्या सबलीकरणासह सर्वांगीण विकासासाठी बँकेने जिल्ह्यातील महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणात अर्थ पुरवठा केलेला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त मुंबईत या पुरस्काराचे समारंभपूर्वक वितरण झाले.
यावेळी ग्रामविकास व राज्यमंत्री अब्दुल सत्तार, वस्त्रोद्योगमंत्री असलम शेख, खासदार अरविंद सावंत, आमदार ॲड. राहुल नार्वेकर, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष ए. वाय. पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.