राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदी राजेश क्षीरसागर कायम

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाच्या समितीचे शासनाने पुनर्गठन केले असून, या समितीच्या कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा पुन्हा राजेश क्षीरसागर यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
     दि.१७ जून २०१९ रोजी राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्ष पदावर राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आजतागायत ते या पदावर कार्यरत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर राज्य नियोजन मंडळ वगळता सर्व समित्या शासनाने बरखास्त केल्या होत्या. परंतु राज्य नियोजन मंडळ सुरूच ठेवले होते. या राज्य नियोजन मंडळ, मुंबई यांचे शासनाने दि.०९ मार्च २०२१ रोजीच्या शासन आदेशान्वये पुनर्गठन केले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या या समितीच्या “कार्यकारी अध्यक्ष” पदावर राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे.
     यासह त्यांना या पदास “मंत्री दर्जा” देण्यात आला आहे. यासह मंत्री दर्जास अनुज्ञेय कार्यालय, सुरक्षा, कर्मचारी, वाहन आदी सुविधा त्यांना देण्यात आल्या आहेत. मंत्रालय समोरील प्रशासकीय इमारतीमध्ये १८ व्या मजल्यावर या समितीस कार्यालय देण्यात आले आहे. या समितीमध्ये उपाध्यक्ष पदावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह समिती सदस्य म्हणून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, नियोजन राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्यासह शासकीय अधिकारी काम पाहतील.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!