चेंबर ऑफ कॉमर्सचे महापालिका प्रशासकांना विविध मागण्यांचे निवेदन

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     घरफाळा पूर्णपणे माफ करावा, पाणीपट्टीमध्ये केलेली दरवाढ मागे घ्यावी, परवाना नुतनीकरणाची मुदत वाढवून मिळावी व परवाना फी, फायरसेसमध्ये केलेली वाढ कमी करावी, तसेच कोल्हापुरातील सर्व दुकाने चालू करण्यासाठी परवानगी मिळावी इत्यादी मागण्यांचे निवेदन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना देण्यात आले.
     कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षी तीन महिने व यावर्षी अडीच महिने असे पाच ते सहा महिने लॉकडाऊनमुळे व्यापार बंद आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ चालू होण्याच्या प्रारंभीच लॉकडाऊन लागू झाला. दुकाने पाच महिने बंद असल्याने व्यापाऱ्यांवर फार मोठे आर्थिक संकट आल्याने कोल्हापूर शहरातील सर्व व्यापाऱ्यांचा आर्थिक वर्ष २०२१-२२ चा घरफाळा माफ करावा.
कोल्हापूर महानगरपालिका शहर पाणी पुरवठा व ड्रेनेज विभागामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहीरातीप्रमाणे कोल्हापूर शहरातील पाणीपट्टीमध्ये करण्यात आलेली दरवाढ ताबडतोब मागे घ्यावी. परवाना नुतनीकरण करुन घ्यावयाची मुदत दि.३० जून २०२१ पर्यंत वाढवून दिली आहे. सध्या ९० टक्के आस्थापने बंद आहेत. तेंव्हा परवाना नुतनीकरण करुन घेणे शक्य नाही. त्यामुळे परवाना नुतनीकरणाची मुदत दि. ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत वाढवून मिळावी. परिपत्रकात नमूद केलेप्रमाणे, परवाना नुतनीकरण मुदत संपल्यानंतर करण्यात येणारी १५ टक्के व २० टक्के दंड आकारणी करण्यात येवू नये. तसेच महानगरपालिकेने व्यापारी / उद्योजकांना विश्वासात न घेता चुकीच्या पध्दतीने परवाना फी व फायरसेसमध्ये दुप्पट ते तिप्पट वाढ केलेली आहे. ही वाढ चुकीची असल्याने ती वाढ तात्काळ मागे घ्यावी. अन्यथा कोणत्याही परिस्थितीत व्यापारी / उद्योजक परवाना नुतनीकरण करणार नाहीत.
कोल्हापूरच्या सर्व व्यापाऱ्यांनी शासनाच्या कोरोना संबधीत सर्व नियमांचे आजपर्यंत कठोर पालन केलेले आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील पॉझिटीव्ही रेट जिल्ह्यापेक्षा बराच कमी आहे. सध्याच्या लॉकडाऊनला दोन महिने उलटून गेले असल्यामुळे व्यापारांवर फार मोठा परिणाम होऊन व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती खुप डबघाईला आली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील अत्यावश्यक व जीवनावश्यकसह सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत उघडण्यासाठी परवानगी द्यावी. इत्यादी मागण्यांचे निवेदन महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे देण्यात आले.
   यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, मानद सचिव धनंजय दुग्गे व जयेश ओसवाल, प्रदीपभाई कापडिया, संचालक अजित कोठारी, प्रशांत शिंदे, तौफिक मुल्लाणी, संपत पाटील उपस्थित होते

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!