• भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने निवेदन
कोल्हापूर • प्रतिनिधी
भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक मागे घेण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांना निवेदन देण्यात आले.
नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकारच्यावतीने सार्वजनिक विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले आहे, या विधेयकामुळे विद्यापीठांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढणार असून या विधेयकाला भारतीय जनता पार्टीचा विरोध आहे. यासंदर्भात भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने भूमिका मांडून निवेदन देण्यात आले.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विजयसिंह खाडे – पाटील म्हणाले की, या विधेयकामुळे विद्यापीठ राजकारणाचा अड्डा होईल. राज्य सरकारकडून कुलगुरूंची नेमणूक होणार असल्याने राजकीय पक्षाच्या संबंधित व्यक्ती कुलगुरू होईल. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री निर्णय घेणार असल्याने त्याचा परिणाम थेट प्रवेश परीक्षा आणि निकालांवर होणार आहे. विद्यापीठातील सर्व नियुक्त्या गुणवत्ता डावलून उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडून होणार आहे. या सर्वाचा शिक्षणाच्या दर्जावर अत्यंत वाईट परिणाम होईल, तरी हे विधेयक त्वरित मागे घ्यावे अशी मागणी पालकमंत्री सतेज पाटील यांना करण्यात आली.
निवेदन देताना शिष्टमंडळात संघटन सरचिटणीस विवेक वोरा, रोहित कारंडे, गिरीश साळोखे, गौरव सातपुते, अनिकेत मुतगी, प्रतिक जांगळे उपस्थित होते.
——————————————————-